अनिल गडेकर यांना बेस्ट पी.आर.ओ.चा सन्मान
नागपूर/प्रतिनिधी:
सन २०१९ हे निवडणूक वर्ष असल्याने लोकशाहीच्या या उत्सवात लाखो तरुण-तरुणी प्रथमच मतदान करीत आहेत तर कोट्यावधी मतदार निवडणुकीच्या अनुषंगाने दैनंदिन घडामोडी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी याची देही याची डोळा अनुभवत आहेत. राजकीय पक्षांची वेगवेगळी मते व स्वतंत्र विचारसरणी असली तरी राष्ट्रीय मुद्द्यांवर सर्व राजकीय पक्षांचे एक मत असणे हि काळाची गरज आहे.
राजकारणाचा खालावत जाणारा स्तर, एकमेकांवरील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, राष्ट्रीय हितामध्ये राजकीय मतभेद लक्षात घेता, माध्यमे, जनसंपर्क क्षेत्रातील अधिकारी आणि व्यावसायिकांची भूमिका जबाबदारीची ठरू शकते. जनमानसात लोकशाहीची मुल्ये रुजविणे, लोकशाही विषयक आदर निर्माण करणे आणि लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये उत्तम सुसंवाद ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य जनसंपर्काच्या माध्यमातून व्हावे या उद्देशाने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाने यावर्षी एक राष्ट्र, एक संकल्प, एक स्वर" हा विषय निश्चित केला आहे.
रविवार २१ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रेस क्लब सभागृह, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे आयोजित ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी नागपूर तर नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मा. श्री.प्रदीपकुमार मैत्र हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
विशेष म्हणजे, माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. अनिल गडेकर जिल्हा माहिती अधिकारी यांना "बेस्ट पी.आर.ओ." म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यामध्ये जनसंपर्क क्षेत्रातील कॉर्पोरेट, शासकीय, खाजगी अधिकारी, व्यावसायिक, पी.आर.एस.आय.सभासद आणि माध्यम प्रतिनिधी सहभागी होत असतात.
तरी जनसंपर्क क्षेत्रातील अधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच माध्यम प्रतिनिधींनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पब्लिक रिलेशन्स सोसायटी नागपूर शाखेच्या
अध्यक्ष-सचिव व समस्त कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.