विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत महावितरणचे
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संजीव कुमार यांचा थेट संवाद
नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक .संजीव कुमार यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. याप्रसंगी औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ठ सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द असल्याची ग्वाही संजीव कुमार यांनी दिली. वीजखरेदी किंमत कमी केल्याबद्दल यावेळी औद्योगिक ग्राहकांच्यावतीने संजीव कुमार यांचे अभिनंदन करण्यात आले.
महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्यात येते. तसेच या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी महावितरणकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येतात असे स्पष्ट करून औद्योगिक ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचा अर्ज ऑनलाईनद्वारेच करावा, असे आवाहन संजीव कुमार यांनी यावेळी केले. औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे अधिक नियोजनबध्दपणे व सातत्याने करावी. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रभावी उपाय योजना कराव्यात तसेच प्रादेशिक संचालकांनी औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यासोबत प्रत्येक महिन्यात बैठकीद्वारे संवाद साधावा, असे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. यावेळी औद्योगिक ग्राहकांतर्फे करण्यात आलेल्या विविध सूचनांची दखल घेण्यात येईल, असे संजीव कुमार यांनी सांगितले.
विदर्भ प्रादेशिक विभागामधील नागपूर, बुटीबोरी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, खामगाव, मुर्तिजापूर, मूल इत्यादी तसेच मराठवाडा प्रादेशिक विभागामधील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे आणि बीड इत्यादी औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदविला.व्हिडीओ कॉन्फरेन्सच्या थेट संवादात संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.