चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील नामांकित असलेले इन्फंट जिजस वसतिगृह अत्याचाराच्या प्रकरणाने कलंकित झाले आहे. काही दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे तक्रार समोर आल्यानंतर सोमवारी आणखी चार विद्यार्थिनींनी तक्रार नोंदविली आहे. म्हणजेच तक्रार कर्त्यांचा आकडा ६ वर पोहचला आहे.या घटनेमुळे विद्यार्थिनसह पालकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळत आहे, या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून विविध स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. निरागस चिमुकल्या विद्यार्थिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध संघटना ,पक्ष ,महिला मंडळ सह इतर स्तरातून केली जात आहे.
राजुरा पोलिसांनी याआधीच छबन पचारे याला अटक केली आहे. सोमवारी सहाय्यक अधीक्षक नरेंद्र लक्ष्मण विरुटकर याला देखील अटक केली. तसेच वसतिगृह अधिक्षिकेसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.पोलिसांनी कलम ३७६ (अ,ब) व पॉक्सो ( प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंसेस) अंतर्गत गुन्हा दाखल करुन पचारे या कर्मचाऱ्याला अटक केली. व त्याला सवेतूनही निलंबित केले आहे.
इन्फंट जिजस सोसायटीच्यावतीने राजुरा येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह आठ-दहा वर्षांपासून सुरू आहे. येथील दोन मुलींना पोटात दुखत असल्याच्या कारणावरून ६ एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीअंती त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब १३ एप्रिल रोजी उजेडात आली.आता आणखी चार मुलींनी तक्रार दिल्याने प्रकरण गंभीर झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रात्रीचे जेवण झाल्यानंतर मुलींना ओआरएसची पावडर दिली जात होती. त्या पावडरमध्येच गुंगीच्या गोळ्या टाकून दिल्या जात असल्याचा तपासातून पुढे आले आहे.