Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

सावलीमध्ये दोन कोटी रुपयांची अभ्यासिका उभारणार : ना. सुधीर मुनगंटीवार


नावलौकिकात भर घालणाऱ्या प्रत्येक संस्थेला मदत करण्याचा आनंद


चंद्रपूर, दि.3 मार्च : महाराष्ट्रातल्या 31 जिल्ह्यांपैकी सर्वात चांगला जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नावलौकिक वाढावे. यासाठी काम करणार्‍या प्रत्येक संस्थेबद्दल आपल्या मनात प्रचंड आदर असून आपण संपूर्ण ताकदीनिशी त्या संस्थेच्या पाठीशी उभे राहतो. सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला सर्वतोपरी मदत भविष्यात करण्यात येईल. सावलीमध्ये दोन कोटी रुपयांची अभ्यासिका उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काल सावली येथे केली.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उद्घाटन व स्मरणिका प्रकाशन सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, सभापती संतोष तगडपल्लीवार,संस्थेचे सचिव संदीप गड्डमवार, राजा पाटील संगीडवार, प्राचार्य चंद्रमोहन, नारायण मेहरे आदी उपस्थित होते.

खासदार अशोक नेते यांच्या खासदार निधीमधून या ठिकाणी ग्रंथालयाचे लोकार्पण, प्रयोगशाळेचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सावलीमध्ये दोन कोटी खर्च करून आपण अभ्यासिका तयार करत असल्याचे सांगितले. याशिवाय सावली आणि पोंभुर्णा ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतीगृह निर्माण होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

उपस्थित विद्यार्थी विद्यार्थींशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, मोठा शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून त्याचा प्रत्येय मिशन शौर्याचा रूपाने आला आहे. ज्यांनी आयुष्यात कधी विमान बघितले नाही त्या 5 आदिवासी विद्यार्थ्यांनी विमानाच्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला सर केले. त्यामुळे आता मिशन शक्ती याकडे आपण लक्ष वेधले असून पॅरिसमध्ये होणाऱ्या 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्यांच्या यादीत चंद्रपूर-गडचिरोलीचे विद्यार्थी असलेच पाहिजे, याकडे आपण लक्ष वेधले आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभे राहत आहे. बल्लारपूरमध्ये तर राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभे राहत आहे.

मिशन सेवाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय नोकरीत चंद्रपूर जिल्ह्याचा टक्का वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे. चंद्रपूर जिल्ह्याचे नाव भारताच्या नकाशावर कोरावे, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार अशोक नेते यांनी प्रास्ताविक करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे या भागाच्या विकासाला झपाट्याने गती मिळाल्याचे मिळत असल्याचे सांगितले. सावली येथे त्यांनी काल बसस्थानकाचे भूमिपूजन, सावली पोलीस स्टेशनचे लोकार्पण केले. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर दोन्ही जिल्हे मुख्य प्रवाहात येत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात मांडले. यावेळी संस्थेचे सचिव संदीप गड्डमवार व नारायण मेहरे यांनी देखील संबोधित केले. या संस्थेकडे सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.