पद्मभूषण राम सुतार यांनी चंद्रपूरसाठी एक सुंदर स्मारक उभारावे: सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर /प्रतिनिधी :पद्मभूषण राम सुतार हे संपूर्ण देशाचे भूषण असून त्यांच्या या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील एक सुंदर स्मारक उभे राहावे अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी राम सुतार यांनी आपला वेळ द्यावा, अशी आग्रही विनंती राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली.
राम सुतार यांचा नागरी सत्कार कार्यक्रम आज चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहांमध्ये सुतार समाजाच्या वतीने करण्यात आला होता. या नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. राम सुतार यांचे चंद्रपूर महानगरतर्फे व सुतार समाजातर्फे सत्कार केल्यानंतर संबोधतांना मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे देखील एक प्रेरणादायी वीर स्मारक उभारण्याचे आपल्या मनात असून त्यासाठी आशीर्वाद व वेळ द्यावा अशी मागणी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आ.नानाभाऊ शामकुळे, आ.संजय रायमुलकर, महापौर अंजलीताई घोटेकर, प्रदीप जाणवे, किशोर जोरगेवार, मनीष कायरकर, रमेश वनकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरांमध्ये गेल्या चार वर्षात नवीन वास्तू उभ्या राहत असून याचा गौरव देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर देखील करीत आहेत. पद्मभूषण राम सुतार हे जे.जे आर्ट स्कूल मधून शिक्षण घेऊन जग विख्यात शिल्पकार म्हणून नावलौकिकास आलेत. सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा सरोवरात उभा राहिलेला जगातला सर्वात उंच पुतळा असो वा संसद परिसरातील महापुरुषांचे पुतळे असोत त्यांच्या पुढे संपूर्ण देश नतमस्तक आहे.
ते जे.जे स्कूल ऑफ आर्टचेचे विद्यार्थी आहेत. हे माहिती झाल्यावर आपण या संस्थेला दोनशे कोटी रुपयांची मदत केली असल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूरमध्ये देखील शूर वीरांच्या संदर्भातील प्रेरणादायी स्मारक उभे रहावे, अशी आपली इच्छा असून त्यासाठी राम सुतार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राम सुतार यांचा आज सुतार समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुतार समाजाच्या सर्व मागण्यांकडे आपण अतिशय गंभीरतेने लक्ष वेधु असे आश्वासनही त्यांनी दिले. राम सुतार हे संपूर्ण भारतासाठी अतिशय आदराचे व्यक्तिमत्व असून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या शुभेच्छा त्यांच्या कायम पाठीशी आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे देखील नाव जगभरात झाले असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.