- नितीन गडकरी यांचा निर्धार
- बंजारा समाज मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
- आ. नीलय नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. शेजारी आ. सुधाकर देशमुख व राज्यमंत्री प्रवीण पोटे.
नागपूर, 24 मार्च
मागील पाच वर्षांपासून देशाचा विकास प्रगतीपथावर आहे. देशाचा चौफेर विकास होतो आहे. आता देशासह राज्य आणि विदर्भाचा चौफेर विकास करणे हेच ध्येय ठेऊन कार्य करीत असून, पुढेही असाच कार्यरत राहणार असल्याचा निर्धार केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सती सामकी माता बंजारा समाज महिला ब़हूउद्देशिय संस्था आणि समस्त बंजारा समाजाच्या संयुक्त विद्यमाने बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन रविवारी सिव्हिल लाईन्स स्थित जवाहर विद्यार्थी वसतिगृह येथे करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून नितीन गडकरी उपस्थितांशी संवाद साधत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार सुधाकर देशमुख, आमदर नीलय नाईक, जितेंद्र महाराज, प्रगती पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, राज्यात मंत्री असताना अनेक विकास प्रकल्प राबविले होते. त्याच अनुभवाचा फायदा केंद्रात कार्य करताना होत आहे. हे सर्व जनतेने दिलेला आशीर्वाद आणि मतांमुळे शक्य झाले आहे. नवनवीन संकल्पना देशभरात राबविण्याचा माझा निर्धार आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यातून 5200 किमीचे महामार्ग जात होते, ते आता 22400 किमीचे करण्यात आले आहेत. 17 लाख कोटींची विकास कामे गेल्या पाच वर्षांमध्ये केली आहेत. शंभर वर्ष रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत असे रस्ते आज देशभरात तयार होत आहेत. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. देशात नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसेच शहरातील अंबाझरी येथील जागेवर स्व. वसंतराव नाईक यांच्या नावावर 30 हजार क्षमतेचे ‘ओपन एअर थिएटर’ उभारण्याची माझी मनीषा आहे. सध्या समाजाला नवीन दिशा देण्याची गरज असल्यामुळे माझा आणि माझ्या पार्टीचा युवकांच्या सर्वांगिण विकासावर भर आहे. गेल्या निवडणुकीत मी तीन लाख मतांनी विजयी झालो होतो. यंदा हा आकडा पाच लाखांच्यावर जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तत्पूर्वी कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार नीलय नाईक यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.
000