नागपूर/प्रतिनिधी:
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. प्राथमिक परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाघिणीचा मृत्यू हा दलदलीत अडकल्याने आणि श्वासनावरोधाने झाला असल्याचे दिसून आले.अधिकाऱ्यांच्या तपासणीत वाघिणीचे नखं, मिशा, सुळे आणि इतर सर्व अवयव मूळ जागेवर आढळून आलेत. यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष सर्व अवयवांसह वाघिणीचे दहन करण्यात आले. वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बहुतेक ७-८ दिवसापूर्वीची असावी असे सांगण्यात आले.