Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २३, २०१९

वणी येथील कारवाईने उमेदवारांना बसला जबरदस्त धक्का


निवडणुकीतील काळा पैसा रोखण्यासाठी आयोगाची विशेष यंत्रणा


चंद्रपूर, दि.22 मार्च: आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी काळा पैशाचा वापर होऊ नये आणि सुजाण नागरिकांनी स्वतःच्या तटस्थ आणि विवेकबुद्धीचा वापर करून केलेल्या मतदानानेच लोकशाही बळकट व्हावी, या दृष्टिने निवडणूक आयोगाने फिरते भरारी पथक आणि स्थिर निगराणी पथक या यंत्रणेची निर्मिती केली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली.
पेड न्यूज रोखण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि देखरेख समिती स्थापन करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी तयार केलेल्या 'सी व्हिजिल' ॲपने नागरिकांद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातून तीन तक्रारी आणि राज्यातून 717 तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या आहेत. तसेच अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचे छापे व अटकसत्र सुरूच आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीवर पैशाचा प्रभाव पडणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेण्याची सूचना निवडणूक खर्च निरक्षक एम.के.बीजू यांनी दिले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा निवडणूक विभागाने फिरते भरारी पथक आणि स्थिर निगराणी पथक या यंत्रणेची निर्मिती केली असून वणी येथील फिरते भरारी पथक क्रमांक एकने 16 मार्चला 10 लाख 80 हजार एवढी रोख रक्कम जप्त केली असून त्या पुढील कारवाईसाठी इन्कम टॅक्स विभागाकडे सोपवण्यात आले आहे. सदर कारवाईमुळे जिल्ह्यातील काळया पैशाचा वापर करणाऱ्या उमेदवारांना जबरदस्त धक्का पोहोचला आहे.

या स्थापन केलेल्या फिरते भरारी पथक आणि स्थिर निगराणी पथकाद्वारे वाहनात व व्यक्तिकडे 50 हजार रुपयाच्यावर रक्कम आढळून आल्यास यासंबंधीचे पुरावे नसल्यास, त्या घटनेची व्हिडिओ चित्रणाद्वारे पंचनामा करून रक्कम जप्त केल्या जाईल. तसेच उमेदवार व प्रतिनिधीच्या वाहनात पुराव्याअभावी 50 हजार पेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यास त्या प्रतिनिधीवर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच स्टार प्रचारक यांच्या वाहनातून पुराव्याअभावी एक लाखापेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यास, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच वस्तू स्वरुपात 10 हजार पेक्षा जास्त किंमतीचे प्रचार साहित्य वाहनांमध्ये आढळून आल्यास पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल.

प्रचार साहित्याच्या वापरावरही निवडणूक आयोगाने विविध बंधने आणलेली आहे. प्रचार वाहनावर वापरण्यात येणाऱ्या झेंड्याचे आकार दुचाकी व तीनचाकी वाहनासाठी 1 फूट बाय1/2 फूट तसेच दुचाकी वाहनावर एकच झेंडा वापरता येणार असून दुचाकीवर कोणतेही बॅनर वापरता येणार नाही. झेंड्याच्या दांड्याची लांबी 3 फूट पेक्षा तसेच बॅनरचा आकार 6 फुट बाय 4 फुट पेक्षा अधिक असणार नाही. याची विशेष दक्षता उमेदवारांनी घ्यावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

                                        0000
मतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाईन

चंद्रपूर, दि.22 मार्च- लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाईनवर दररोज विचारणा केली जात असून कॉल येत आहेत. याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाईन सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जात आहे.

हेल्पलाईनची वैशिष्ट्ये 
 नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती वेळोवेळी देणे
 नवीन मतदार नोंदणी सोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन
 मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे याबाबतही मार्गदर्शन
 मतदान ओळखपत्र व मतदान अर्ज निगडित सर्व माहिती उपलब्ध
 मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमधून माहिती
 निवडणूक संदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल.
 राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन
या हेल्पलाईनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदार यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचे  तपशील,मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी,निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाइल ॲप किंवा www.nvsp.in पोर्टल किंवा 1950 हेल्पलाईनवर फोन करून मिळविता येत आहे.

1950 या हेल्पलाईनवर पुढीलप्रमाणे माहिती मिळविता येते :

(i) ECI <EPIC Number> <0 (इंग्रजीमध्ये उत्तरासाठी) किंवा (प्रादेशिक भाषेत उत्तरासाठी) <1.
(ii) ECIPS <EPIC NUMBER>असे केल्यास EPIC नंबर मतदाराला मतदान केंद्राचा पत्ता मिळेल.
(iii)ECICONTACT <EPIC NUMBER> हे मतदारांना बूथ लेव्हल ऑफिसर्स, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संपर्क तपशीलांसह उत्तर देतील. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी           डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.