चंद्रपूर - प्रतिनिधी दिनांक 11 मार्च पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 400 कंत्राटी कामगारांपैकी 15 महिला कामगार व दोन पुरुष कामगारांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे.जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता.या आंदोलनाची लेखी सूचना पोलीस व जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती.मात्र तिसरा दिवस असतानाही महिला तसेच पुरुष आंदोलकांची तपासणी करायला डॉक्टर आले नाही.रात्री शेकडो महिला मंडपात झोपलेल्या असताना सुरक्षा व्यवस्था नाही.या गोष्टीमुळे संतप्त होऊन आज दिनांक 13 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता अचानक आंदोलनकर्त्यांपैकी शेकडो महिला पुरुष कामगार पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घराकडे मोर्चा घेऊन गेले. तसेच त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी कामगारांच्या हातांमध्ये असलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अनुसूचित जातीच्या 15 महिला कंत्राटी कामगार पोलिसांना सूचना देऊन उपोषणाला बसल्या परंतु अजून पर्यंत तपासणी नाही- सुरक्षा नाही, आता पहा पोलीस कसे तातडीने येतात,कारण आमदार खासदार मंत्री यांच्या जीवाची काळजी आहे, सामान्य माणसाच्या नाही" असे लिहिलेले फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यानंतर पोलिस तातडीने त्या ठिकाणी दाखल सुध्दा झाले. मात्र आंदोलनकर्त्यांचे फलक पाहून पोलिसांची स्थिती सुद्धा खलील झाल्यासारखी होती. यानंतर कामगार आंदोलन कर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. अर्ध्या तासानंतर सर्व कामगार व जन विकास सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली...बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न - पप्पू देशमुख यांचा आरोप
कामगारांचे पालक मंत्री यांच्या घरासमोर निदर्शने सुरू असताना निदर्शने झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली व शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले यावेळी आंदोलन च्या मंडपामध्ये बोटावर मोजण्याएवढे कामगार व 17 उपोषणकर्ते कामगार उपस्थित होते.आज पावेतो पोलीस सुरक्षेसाठी आले नाही तसेच डॉक्टरही साध्या तपासणीसाठी आले नव्हते.परंतु जेव्हा सर्व कामगार पालकमंत्री यांच्या घरावर आंदोलनासाठी गेले त्यावेळी डॉक्टरांची एक चमू आंदोलनकर्त्यांच्या मंडपात आले व त्यांनी पोलिसांच्या सहाय्याने बळाचा वापर करून पाच आंदोलनकर्त्या महिलांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये भरती केले. यावेळी आंदोलन कर्त्या व त्यांच्यासोबत असलेल्या महिला कामगारांनी विरोध केला. मात्र मोजके कामगार असल्यामुळे त्यांच्या विरोधाला न जुमानता सुरेखा मडावी, अनिता बोरेवार, सरिता खोब्रागडे, लता उईके व पुष्पा गुम्मलवार या पाच कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.