जुन्नर /आनंद कांबळे
महाराष्ट्र राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे उद्या सोमवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
जुन्नरचे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे हे शिवसेनेचे शिवसैनिक होते . शिवसेनेने त्यांना दिलेली विधानसभेची उमेदवारी कापून आशाताई बुचके यांना दिली होती.
सन २०१४ साली शिवसेनेला रामराम ठोकून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.परंतु ते कधीही मनसेच्या व्यासपीठावर दिसले नाहीत की,मनसेची तालुक्यात वाढ केली नाही.
भाजपची सत्ता असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चांगले संबंध ठेवून मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी आणला आहे.
शिवसेनेच्या अनेक शिवसैनिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
आमदार शरददादा सोनवणे यांनी सांगितले की,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. खासदार आढळराव पाटील मी शिवसेनेत यावे याकरिता आग्रही आहेत.तसेच अनेक शिवसैनिकांची इच्छाही आहे की,मी शिवबंधन बांधावे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश निश्चित आहे.
जिल्हा परिषदेच्या गटनेत्या व विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या आशाताई बुचके व त्यांचे समर्थक यांचा मात्र शरददादा सोनवणे यांना शिवसेनेत घेण्यास विरोध आहे. त्याकरिता मातोश्रीवर जावून याबाबत मत मांडलेले आहे.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मात्र शरददादा सोनवणे यांना शिवसेनेत घेण्यास आग्रही असल्याने सोमवारी प्रवेश निश्चित आहे.