जुन्नर /आनंद कांबळे
शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडे खंबीर उमेदवार नसल्याने. राष्ट्रवादी कडून अमोल कोल्हे यांना ‘मराठा’ म्हणून नव्हे तर ‘माळी’ म्हणून शिरूरच्या निवडणुकीत उतरवले आहे, असं वक्तव्य आढळराव पाटील यांनी केलं होतं. तर आता अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याला उत्तर दिले आहे. माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे, असा पलटवार अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर केला आहे.
जुन्नर तालुका राष्ट्रवादी व आय काँग्रेस च्या वतीने नारायणगाव येथे आयोजित केलेल्या स्वागत मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, भोसरीचे मा. आमदार विलास लांडे,जुन्नरचे माजी आमदार दिलीप ढमढेरे,पारनेर तालुक्याचे लोकनेते निलेश लंके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर,युवानेते अतुल बेनके, जालिंदर कामठे, देवदत्त निकम,बाजार समितीचे सभापती संजय काळे,देवराम मुंढे, आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघात जन्माला येणार प्रत्येकजण हा खूप मोठा भाग्यवान असतो. कारण शिरूरच्या परिसरात जन्माला येणाऱ्याला खूप मोठी प्रेरणास्थान लाभली आहेत.म्हणजे शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे संभाजी महाराज.
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठी देत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे अनेकजन अचंबित झाले आहेत. तर राष्ट्रवादी कडून अमोल कोल्हे हे येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या बड्या नेत्याच्या विरुद्ध निवडणूक लढवणार असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.
◆ शिरूर लोकसभेच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हि घोषणा आज दिग्गज नेते करतील या अपेक्षेने मेळाव्याला मोठया संख्येने गर्दी जमली होती. मात्र पक्षाच्या बड्या नेत्यांनी उमेदवार कोण असणार हे घोषित न करता फक्त राष्ट्रवादी व आय काँग्रेस पक्ष्यांच्या वतीने जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले. यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले.
◆ शिरूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी ला मदत केली जाईल मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला मदत करावी.
-सत्यशील शेरकर (अध्यक्ष-श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखाना)