केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी
सर्व समावेशक विकास शासनाचे ध्येय
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
मध्य नागपूरातील डी.पी.रस्त्याचे भूमीपूजन व एस.आर.ए. अंतर्गत मालकी हक्कांचे वाटप संपन्न
नागपूर/प्रतिनिधी:
मध्य नागपूरातील एम्प्रेस मिलच्या जागेलगत रेडीमेड गारमेंट झोनची स्थापना होणार असून यामूळे मध्य नागपूरातील 10 हजार महिला व युवकांना शिवणकाम तसेच जरीकामाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे जाहीर केले. स्थानिक राजवाडा पॅलेस येथे गितांजली चौक ते गांधीसागर तलाव पर्यंत डी.पी. रोडचे भूमीपूजन व झोपडपट्टी पूनवर्सन प्राधिकरण योजने अंतर्गत 13 लाभार्थ्यांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्राच्या वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस व प्रमुख अतिथींच्या स्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने उपस्थित होते.
मध्य नागपूरात रस्त्यांच्या विस्तारिकरणासाठी अडचणी येत होत्या पण, केंद्रीय रस्ते निधीमधून सुमार 100 कोटीची तरतूद करून मेयो हॉस्पिटल ते जुना भंडारा रोड या रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादनाचे कार्य चालू झाले आहे. यामूळे प्रभावित लोकांना बाजारभावानूसार योग्य भरपाई व पर्यायी व्यवस्था देण्यासाठी राज्यशासनाने योग्य ती कार्यवाही सुद्धा केली आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
पश्चिम नागपूसारखेच विकासकार्य आता मध्य व पश्चिम नागपूरात होत आहेत. राज्य शासनाची भूमिका ही सर्वसमावेशक विकासाची आहे, अशी भावना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. मध्य नागपूरात ‘ई-लायब्ररी’ स्थापन करण्यासाठी आपण मान्यता दिली असून यासंदर्भातील प्रस्ताव महानगरपालिकेने शहरी विकास खात्याला त्वरित पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली.
गितांजली चौक ते गांधीसागर तलाव व तसेच मारवाडी गल्ली ते एम्प्रेस मॉल या दोन डी.पी. रस्त्यांमूळे एम्प्रेस मॉल तसेच इतर चौकातली वाहतूक व्यवस्थेची कोंडी कमी होणार आहे. या रस्त्यांसाठी सुमारे 15 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 4.5 कोटी रस्तेनिर्मितीसाठी तर 9.5 कोटी पूनवर्सनासाठी आहे. या अंतर्गत भूसंपादनामूळे प्रभावित लोकांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणपत्राचे वाटप आज होत आहे, अशी माहिती प्रभाग क्रमांक 19 (ड) चे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिली.याप्रसंगी प्रभागातील नागरिक, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.