चंद्रपूर/प्रतिनिधी:
पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या घोडाझरी अभयारण्यात शनिवारपासून नाइट सफारी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीत चार गाड्या प्रकल्पात पाठविण्यात आल्या. त्यात स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.
नागपूरपासून १०३ किमी अंतरावर नागभीड तालुक्यात घोडाझरी आहे. घोडाझरीच्या तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून इंग्रजांनी घोडाझरी तलावाची निर्मिती १९०५मध्ये केली. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध व्हावे, अशी इंग्रजांची कल्पना होती. पण, आता हा तलाव नागभीड-सिंदेवाही या तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीस सिंचन उपलब्ध करून देतानाच पूर्व विदर्भातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. म्हणूनच वर्षभर पर्यटक येथे भेट देत असतात. घोडझरी अभयारण्यात नाइट सफारीचे उद्घाटन चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनाधिकारी कुलराज सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पहिल्या फेरीत चार गाड्या प्रकल्पात गेल्या. त्यात स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
वन्यजीवांचे सहजतेने दर्शन
घोडाझरी अभयारण्यात वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन जवळच असल्याने येथे वाघ-बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचे सहजतेने दर्शन होते. या अभयारण्यात सुमारे १५ वाघ, २५ बिबट यांच्यासह रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय व अन्य वन्यजीव आहेत.
नाइट सफारी : १८ किमी
प्रत्येक गाडीला शुल्क : ५०० रुपये
एका गाडीत पर्यटक : ०४
- गाइड : आवश्यक
- प्रवेश : ऑन द स्पॉट
- वेळ : रात्री ८ ते १० वाजतादरम्यान
विरोध कायम
घोडाझरी अभयारण्यात 'नाइट सफारी' ला वन्यजीवप्रेमींनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. नाइट सफारी वन्यजीव व मानव वन्यजीव संघर्षाला कारणीभूत ठरेल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. आधीच ब्रह्मपुरी वनविभागात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. यातच वनविभागाने सफारी सुरू केली. त्यामुळे वन्यजीवाच्या अधिवासावर विपरित परिणाम होईल. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊन त्यांचे भ्रमण मार्ग खंडित होणार असल्याचेदेखील पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. निशाचर वन्यजीवांचे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. वन्यजीवांना शांत वातावरण न मिळाल्यास ते गावाकडे येतील आणि त्यातून मानवावर हल्ले वाढण्याचे प्रमाण वाढेल, अशी भीतीदेखील व्यक्त केली आहे.