हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी सरपंचांनी पुढे यावे : ना सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर/प्रातिनिधी:
गावांचा विकास करण्यासाठी अनेक योजनांची गरज असली तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी प्रत्येक वेळी पैशांची गरज नसते. उत्तम विकासाचा दृष्टिकोन आणि गाव बदलण्याची महत्त्वाकांक्षा अनेक गावांमध्ये आनंद फुलू शकते. आपल्या गावाचा विकास करताना भौतिक सुविधांसोबतच गावाचा हॅपिनेस इंडेक्स वाढेल यासाठीही सरपंचांनी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
नवभारत या वृत्तपत्र समूहाचे भावंड असणारे मराठी दैनिक नवराष्ट्र या दैनिकाच्या सरपंच सम्राट कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, नवभारत वृत्तपत्र समुहाचे उपाध्यक्ष मुकेश दुबे, व्यवस्थापक प्रशांत चहांदे, जिल्हा प्रतिनिधी संजय तायडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष ज्योती डोंगरे,प्रशांत गजभिये आदींची उपस्थिती होती.
ना ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या नवभारत वृत्तपत्रसमूहाच्या राष्ट्रीय बाण्याचे कौतुक आहे. भारत पारतंत्र्यात असतांना या वृत्तपत्राच्या धुरिणांना वर्तमान पत्राचे नाव नवभारत ठेवून आपली राष्ट्रभक्ती व्यक्त केली आहे. नवभारत हे कायम सकारात्मक वृत्तपत्र आहे. वृत्तपत्र हे कायम समाजाला दिशा देणारे माध्यम असावे, समाजाची दशा घडवणारे नसावे.
यावेळी सरपंचांशी संवाद साधतांना त्यांनी आपल्या गावामध्ये किती योजना राबविण्यात आल्या? आपल्या गावाची भौतिक संपन्नता किती वाढली? पर कॅपिटा इन्कम किती वाढला. यापेक्षाही हल्ली तणावाच्या जीवनामध्ये आपल्या गावाचा हॅपिनेस इंडेक्स किती आहे, हे महत्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात गावे डिप्रेशनची केंद्र होता कामा नये. यासाठी त्यांनी जगातल्या 193 देशांमध्ये फिनलँड हे राष्ट्र अतिशय आनंदी राष्ट्र म्हणून पुढे आल्याचे सांगितले. योजनांसोबत गावाच्या भल्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यसनमुक्ती, स्वच्छता, दर्जेदार शिक्षण, पर्यावरणाचे संतुलन, उत्तम आरोग्य, याकडेदेखील सरपंच यांनी लक्ष वेधावे,असे त्यांनी सांगितले.
देशामध्ये कितीही बळकट सरकार असेल परंतु गावांचा विकास झाला नाही तर या संपन्नतेला अर्थ नाही. त्यामुळे शेवटच्या टोकावर विकास साधला जावा, यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या सरपंचांनी गावच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील सरपंचाशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेत गाव हे महत्त्वाचे सत्ता केंद्र असून गावांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना त्यांनी आखल्या असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रत्येक योजनेचे केंद्रस्थान हे गाव असते. हीच बाब राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील मेरा देश गाव मे बसता है, असे म्हटले होते. त्यामुळे सामान्य माणसाला सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरपंचांनी प्रयत्न करावे असे ते म्हणाले. केंद्र सरकारने 14 लाख कोटी रुपये ग्रामीण विकासासाठी राखून ठेवले आहे. त्यामुळे विविध योजना मोठ्या संख्येने गावाकडे वळत्या झाल्या आहे. या योजनांचा लाभ सामान्य माणसांना मिळावा यासाठी सरपंच यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावामध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी समन्वयाने काम केल्यास शेकडो विकासाच्या योजना गावांच्या सामान्य नागरिकाला सक्षम पणे मिळू शकतात. त्यासाठी प्रयत्न प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. नवराष्ट्र सारख्या दैनिकाने सामाजिक भावनेतून अशा पद्धतीने सरपंचांना पुरस्कृत करणारी योजना आखली याबद्दल त्यांनी व्यवस्थापनाचे देखील आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी संजय तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.