नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी प्रभाग क्र. २४ मधील नगरसेवक प्रदीप वसंतराव पोहाणे यांची अविरोध निवड झाली.
मावळते स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सभापती पदासाठी मंगळवारी (ता. ५) सकाळी १०.३० वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवारी प्रदीप पोहाणे यांनी चार नामांकन अर्ज दाखल केले.त्यांच्या चार अर्जामध्ये अनुक्रमे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी, नगरसेविका यशश्री नंदनवार, नगरसेवक संजय महाजन आणि नगरसेविका सोनाली कडू हे सूचक होते तर अनुक्रमे नगरसेवक शेषराव गोतमारे, नगरसेविका वंदना भगत, नगरसेविका मंगला खेकरे,नगरसेविका मनिषा अतकरे हे अनुमोदक होते. श्री. पोहाणे यांचे चारही नामांकन अर्ज वैध ठरले. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने नगरसेवक प्रदीप पोहाणे यांना स्थायी समितीचे सभापती म्हणून अविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यानंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नवनिर्वाचित सभापती प्रदीप पोहाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मावळते स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा व अन्य सदस्यांनीही श्री. पोहाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्ता ते स्थायी समिती सभापती
नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती हे अवघ्या ३० वर्षाचे असून त्यांचा संपूर्ण परिवार भारतीय जनता पार्टीचे कार्य करीत आहे. वडील वसंतराव पोहाणे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. प्रदीप पोहाणे हे सुद्धा विद्यार्थी दशेपासूनच पक्षाचे कार्य करतात. २६ एप्रिल १९८७ रोजी जन्मलेले प्रदीप पोहाणे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात मोडत असलेल्या भंडारा मार्गावरील सूर्यनगर, ढोबळे ले-आऊट येथील रहिवासी आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मंत्री, उपाध्यक्ष आणि महामंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या पुढाकारातून प्रदीप पोहाणे यांना सन २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३४ मधून उमेदवारी मिळाली आणि ते वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्यांदाच निवडून आले. नगरसेवकपदाच्या संपूर्ण कार्यकाळात अर्थात सन २०१२ ते सन २०१७ दरम्यान ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. दरम्यान सन २०१३-१४ या काळात लकडगंज झोनचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते प्रभाग क्र. २४ मधून ३८०० मतांनी विजयी झाले आणि आता सन २०१९-२० या कार्यकाळाकरिता ते स्थायी समिती सभापती म्हणून अविरोध निवडून आलेले आहेत.