पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल मारहाण करणारे आरोपीही अल्पवयीन
मूल दि.२५ (प्रतिनिधी):
एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन शाळकरी मुलीला मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच घडले. मुलीचा वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी आरोपी विरुद्ध पास्को अंतर्गत गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर केले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधार ग्रूहात करण्यात आले.
शहरातील एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याची अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रीणीसह येथील बागेत फिरायला गेली होती. बागेतून घरी परत येत असतांना दोन अल्पवयीन मुले त्यांच्या पाठीमागून येवुन पीडित मुलीचा हात पकडून तिचे स्कुटी वाहन थांबवायला भाग पाडले. त्या नंतर पिडीत मुलीला बळजबरीने आपल्या वाहनावर बसवून तिला जवळच असलेल्या छोटा सोमनाथ येथील जंगलात नेले.
तिथे तिला मारहाण करून तू माझ्या वर प्रेम कर, माझ्या शिवाय दुसऱ्या कुणावर प्रेम केल्यास तुला जीवानिशी मारून टाकेल अशी धमकी दिली. पिडीत मुलीचा मैत्रिणीने घडलेला प्रकार तिचा पालकांना सांगितले. पालकांनी नातेवाईकांसह पिडीत मुलीचा शोध घेतला. मुलगी छोटा सोमनाथ येथील जंगलात रडत बसली होती. पिडीत मुलीचा पालकाने सदर घटनेची तक्रार मूल पोलीस ठाण्यात केली. पोलीसांनी घटनेचा तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची बालसुधार ग्रूहात रवानगी केली. पुढील तपास चंद्रपूरच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहे.