पोलीस विभागाच्या कार्यपध्दतीत गुणात्मक बदल
--- मुख्यमंत्री
नागपूर दि. 6: पोलीसांच्या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे सामान्य नागरिक न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिथे त्याचे म्हणणे ऐकले जाते,चांगल्या पद्धतीने त्याला वागणूक दिली जाते. ही लोकाभिमुखता दिसून येत असून मागील चार वर्षांत पोलीस विभागात गुणात्मक बदल झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
बजाजनगर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले,आमदार सुधाकर कोहळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय उपस्थित होते.
नागपूर मध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात पोलीस विभागाच्या कार्यपध्दतीत गुणात्मक बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस दलाचे काम सुलभ व वेगवान झाले आहे. सीसीटीव्ही सर्विलन्स, गुन्हे तपासणीचा दर, दोष सिध्दीचा दर वाढला असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी नागपुरातील पोलीस स्टेशनचे विभाजन केले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असेही त्यांनीयावेळी सांगितले.
नागपूर शहराची वेगाने प्रगती होत असून त्यानुसार पोलीस स्टेशनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती व त्याचा पाठपुरावा केल्यामुळे पाच पोलीस स्टेशन मंजूर झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाचही पोलीस स्टेशन सुरु झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे याला प्राधान्य देतानाच पश्चिम नागपूर सारख्या भागात कुठेच गुन्हे घडू नयेत. परंतु घडल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सक्षम असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बजाजनगर नूतन पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन केले. तसेच कोनशिलेचे अनावरण करुन व्यवस्थेची माहिती घेत पोलीस दलाला शुभेच्छा दिल्यात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले. तर प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नवीन बजाजनगर पोलीस स्टेशनसंदर्भात माहिती दिली.