औरंगाबाद, दि. 16 (जिमाका)- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झालेत. त्यांच्या पार्थिवास आज सकाळी औरंगाबाद येथे चिकलठाणा विमानतळावर शासकीय मानवंदनेसह आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या वतीने शहीद जवानांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शहीद जवानांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, खा.चंद्रकांत खैरे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड,आ.संजय शिरसाठ, आ.इम्तियाज जलील, आ.अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, केंद्रिय राखीव पोलीस दलाचे प्रमुख राजकुमार, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, केंद्रिय राखीव पोलीस दलाचे बि.से.टोपो, जिल्हाधिकारी उदय चौधऱी, कर्नल डी.के.राणा, कर्नल विभाकर त्यागी, केंद्रिय राखीव पोलीस दलाचे कमांडर संजिव कुमार ,पोलिस अधीक्षक आरती सिंग सिंह, जहाज वाहतुक मंत्रालयाचे कॅप्टन पियुष सिन्हा, डेप्युटी कमांडर ए.मन्ना, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी.टी.साळवे, यांच्यासह उपस्थित आजी माजी लोकप्रतिनीधी यांनी शहीद जवानांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मोठया संख्येने नागरीक, विद्यार्थी,महिला यांची उपस्थिती होती. शहीद जवान संजय राजपूत अमर रहे, भारतमाता की जय, शहीद जवान नितीन राठोड अमर रहे, वंदे मातरम या घोषणांसह उपस्थित जनसमुदयाने यावेळी शहीदांना आदरांजली अर्पण केली. दोन्ही पार्थिव शहीद जवान संजय राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या मूळगावी नेण्यात येणार असून त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.