चंद्रपूर दि. 15 फेब्रुवारी : एखाद्या वास्तू संदर्भात मनात आराखडे तयार करावे आणि ती कल्पनेपेक्षा प्रत्यक्षात अधिक आकर्षक दिसावी, अशा उस्फुर्त प्रतिक्रिया काल चंद्रपूर वासियांनी महाकाली मंदिराच्या विकास आराखड्याबद्दल व्यक्त केल्या. चंद्रपूरसह व विदर्भ मराठवाडयातील नागरिकांची अराद्यदैवत असणाऱ्या माता महाकालीच्या मंदिराच्या सुशोभीकरणाचा आराखडा काल सायंकाळी राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेच्या दरबारात मांडला. पुढील काही दिवसात या आराखड्यासंदर्भात जनतेच्या सूचना, मते मागविण्यात आले आहे.
माता महाकाली देवस्थान विकास परिषदेच्या आयोजनात पुणे येथील एका प्रतिष्ठित संस्थेने तयार केलेल्या आराखड्याला सादर करण्यात आले. हा आराखडा बघण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात व शहरातील सर्व नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये विविध मंदिराचे ट्रस्टी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. देशातील नामवंत मंदिरांना शोभेल अशा पद्धतीचे सुशोभीकरण माता महांकाली मंदिराचे होणार आहे. मूळ मंदिराच्या गाभ्याला कुठलाही हात न लावता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तसेच भाविकांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी दूर गावावरून येणाऱ्या लोकांना उत्तम आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे हा आराखडा कसा असेल याबाबतचे दृकश्राव्य सादरीकरण गुरुवारी सायंकाळी प्रियदर्शिनी हॉलमध्ये करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले देशविदेशात व देशातील अनेक पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधी देत असताना आपली स्वतःची श्रद्धा असणाऱ्या महाकाली मंदिराच्या सुशोभीकरणाचा अनेक दिवसाचा प्रस्ताव मनात होता. त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण करताना मंदिराचे ट्रस्टी या ठिकाणी असणारे दुकानदार व या परिसरातील नागरिक तसेच महाकाली मातेवर श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे मत जाणून घ्यावे यासाठी या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना तयार करण्यात आलेला आराखडा मान्य नसेल तर त्यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये बदल करण्यात येईल. त्यांना हा आराखडाच नको असेल तर तो रद्द देखील करण्यात येईल. तथापि, या मंदिराचे सुशोभीकरण करताना येणाऱ्या भाविकांनी शहराची सकारात्मक प्रतिमा सोबत घेऊन जावी. हा आपला यामागील उद्देश असून त्यामुळे अशा प्रकारच्या कामांमध्ये प्राविण्य असणाऱ्या संस्थेला यासंदर्भातील आराखडा तयार करण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरातील दुकानदारांनी आपल्या व्यवसायावर परिणाम होईल का किंवा त्यात काही बदल हवा असल्यास ते देखील त्यांनी सुचवावे असे ते म्हणाले यावेळी नागरिकांसाठी सूचना पेटी ठेवण्यात आली होती. शहरातील अनेक नागरिकांनी लेखी सूचना यामध्ये टाकल्या या सूचनांचा अभ्यास समिती करणार असून त्यानंतर या आराखड्याला सर्वांच्या मान्यतेने अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर , वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल आमदार नानाभाऊ शामकुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे सभापती ब्रिजभूषण पाझारे मुख्य अभियंता सुषमा साखरवाडे यासह मंदिराचे ट्रस्टी व अन्य मान्यवर उपस्थित होते.