सांगली - शुक्रवारी दुपारी एक वाजता सांगली येथील लिमये मळ्यात एका अपार्टमेंटमध्ये दोन लहान अंदाजे तीन वर्ष वयाची जुळी मुले चौथ्या मजल्यावर फ्लॅटच्या दरवाजाचे लॅच लॉक लागल्याने अडकली असल्याची वर्दि अग्निशमन दलास मिळताच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन रवाना झाले.
घटनास्थळी पोहचल्यानंतर अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी अडकलेल्या मुलांच्या आईकडून घटनेची माहिती घेतली. दोन्ही मुले झोपलेली असताना जोरात वारा आल्याने दरवाजाचे लॅच लागल्याचे त्यांनी सांगितले. तातडीने अधिकारी कांबळे यांनी चौथ्या मजल्यावर गॅलरीमधून प्रवेश करुन लॅच उघडायचा निर्णय घेतला. त्यांच्या दोन जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाची मोठी शिडी लावून स्वत: त्यांनी शिडीव्दारे चौथ्या मजल्याच्या गॅलरीत प्रवेश केला. गॅलरीतील रुमचे दार उघडे आहे पाहता आतमधे जाऊन त्यांनी प्रथम रडणाऱ्या मुलांना जवळ घेऊन धीर दिला व मुख्य दरवाजा उघडत मुलांना सुखरुप आईच्या स्वाधीन केले.
सांगलीचे अग्निशमन अधिकारी चितांमणी कांबळे तसेच वाहनचालक लक्ष्मण धस व जवान विशाल रसाळ, रुद्रेश्वर केंगार यांचे त्या मातेने भावुक होत आभार मानले. तसेच तेथील रहिवाशांनी अवघ्या पंधरा मिनिटात केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.