राजु पिसाळ (कराड)
पुसेसावळी : वडगाव येथील जयरामस्वामी विद्यालयाच्या प्रांगणात आबालवृद्धांचा मेळा रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात एकत्र आला होता.निमित्त होते माजी विद्यार्थी संघाच्यावतीने आयोजित केलेल्या वैज्ञानिक प्रयोग व अवकाश निरीक्षण या कार्यक्रमातून विज्ञानाची जादूई दुनिया अनुभवता आली.
प्रथमत:च ग्रामीण भागात झालेल्या या अवकाश निरीक्षणाला सर्वांनी कुतुहलाने मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला.त्यांनी अवकाश निरीक्षणाचा मनमुराद आनंद लुटला. विविध प्रयोग, विज्ञानातील सिद्धांत, टाकावू वस्तूपासून तयार केलेली व वैज्ञानिक तत्वे स्पष्ट करणारी खेळणी यात मुलांनी समरसतेने सहभाग घेवून विज्ञानातील शंकांचे समाधान करुन घेतले.स्वानुभवातून शिक्षणाचा मंत्र घेतला.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.तर तहानभूक हरवून विद्यार्थी वैज्ञानिक प्रयोगात तल्लीन झाले होते.
पुस्तकाबाहेरील ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले.परिसरातील घटनांचे बारकाईने व चिकित्सकपणे निरिक्षण म्हणजेच विज्ञान याचा उलघडा त्यांना झाला.सामान्यातील सामान्य विद्यार्थी विज्ञानातील सिद्धांत समजून घेतील.टाकावू वस्तूपासून विद्यार्थी वर्ग विज्ञानातील जादूकडे आकर्षित होईल.तसेच,विद्यार्थी नवनवे तंत्र अवगत करतील.हेच या उपक्रमाच वैशिष्ट्य ठरले.
विद्यार्थ्यासाठी ही दुनियाच प्रयोगशाळा आहे.या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना न शिकवताही ते नकळतपणे शिकून जातात.याचा उलघडा पालकांना झाला. विद्यार्थी व पालकांना आयुका संस्थेचे महारुद्र मते, रुपेश लबडे, तुषार पुरोहित,राजेंद्र माने यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य संजय पिसाळ,पर्यवेक्षक बी.ए.घाडगे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी सुजाता जाधव, एल.आर.जाधव यांनी या उपक्रमास भेट देवून कौतुक केले.