Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २४, २०१९

किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घ्यावा : ना. हंसराज अहिर



  • शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी तयार 
  • गृहराज्य मंत्र्यांकडून चंद्रपूरमध्ये पात्र शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार

चंद्रपूर, दि. 24 फेबुवारी : शेतक-यांना निश्चित, नियमित किमान आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. या योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहचवा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात ना.अहीर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती वंदना पिंपळशेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधीकारी डॉ. उदय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांच्यासह कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना हंसराज अहिर यांनी देशामध्ये एका मोठ्या योजनेचा शुभारंभ होत असल्याचा आनंद व्यक्त केला. आधी घोषित केल्या प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक योजना या शेतकरी केंद्रित असून शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडावा यासाठी मनापासून काम करणारे ते प्रधान सेवक आहेत. देशातील सर्व क्षेत्राला, सर्व वर्गाला घेऊन ते वेगवेगळ्या योजना तयार करत असतात. त्यामुळेच केंद्रातून मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पैसा दिला आहे. शाश्वत शेतीसाठी त्यांचा प्रयत्न असून आजारी व बंद पडलेल्या अनेक प्रकल्प उपक्रम त्यांनी सुरू केले आहे. या सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा प्रशासनासह कृषि विभाग व जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु असून लवकरच शेतक-यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अभिनव पध्दतीचा वापर करून पाण्याचे योग्य नियोजन करून कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शेतक-यांच्या सन्मानासाठी ही योजना आहे. शेवटच्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र लाभार्थ्यांचा यावेळी हंसराज अहिर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. सदरील योजनेतंर्गत विहित निकषांप्रमाणे ज्या कुटंबाचे (पती , पत्नी व त्याची 18 वर्षाखालील अपत्ये) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटूंबियास 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे दरवर्षी 3 हप्त्यात 6 हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता 31 मार्चपर्यंत शेतक-यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.

गावपातळीवर पात्र शेतक-यांच्या कुंटूबीयांचे निश्चितीकरण करुन लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी शेतक-यांचे नाव, लिंग, प्रवर्ग, आधारक्रमांक, बँकखाते क्रमांक , आयएफएससी कोड, मो. क्रं. जन्मतारीख व पत्ता इत्यादी माहिती शेतक-यांनी द्यावयाची आहे. तसेच सामाईक कुटूंबातील एक सदस्यांनी योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा करण्यासाठी स्वयंम घोषणापत्र द्यावयाचे आहे. लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोटर्लवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीव्दारे निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर,तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या असून त्यानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले. तसेच मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटिल यांनी केले. संचालन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.