नागपूर, ता. १८ : जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘मिशन झिरो पेंडेसी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहिम उपक्रमाअंतर्गतशहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड मिळणार आहेत. त्याअंतर्गत नागपूर महानगरपालिका, समाज कल्याण विभाग, अपंग कल्याण विभाग आणि जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र यांच्या वतीने सोमवारी (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या मनिषा अतकरे, रश्मी धुर्वे, नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समग्र शिक्षा तथा जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अभिजीत राउत उपस्थित होते.
विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांगांजवळ अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ‘मिशन झिरो पेंडेसी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहिम उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांग बांधवांना घरपोच प्रमाणपत्र देण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
आयआरसीटीसीद्वारे प्रदान करण्यात येणा-या ई-स्मार्ट कार्डमुळे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन तिकीट सवलतीच्या दरात मिळणार आहेत. तिकीटसाठीही दिव्यांगांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. प्रवासादरम्यान ई-स्मार्ट कार्ड सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात येणा-या प्रवास सवलतीमुळे अनेक दिव्यांगांना लाभ होणार आहे. ई-स्मार्ट कार्डमुळे दिव्यांगांना प्रवासाठी विविध दस्तावेज बाळगण्याची गरज नसून एका ई-स्मार्ट कार्डमुळे रेल्वे प्रवासातील सर्व सुविधांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेले यूनिक आयडी कार्ड (आयआरसीटीसीद्वारे सवलत आधारित ई-तिकीट) योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ई-स्मार्ट कार्डकरीता दिव्यांगांकडून रेल्वे सवलत प्रमाणपत्र, छायाचित्र ओळख पुरावा, जन्माचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रेल्वे फोटो ओळखपत्र मिळविण्याकरिता संबंधित कागदपत्रांच्या एक छायाप्रत संच प्रमाणित (स्वंय प्रमाणित) करून दोन हजार दिव्यांग बांधवांचे दस्तावेज मागविण्यात आले. संपूर्ण दस्तावेज नागपूर महानगरपालिका समाज कल्याण विभाग व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या वतीने तयार करून जिल्हाधिकारी नागपूर यांच्या पत्रासह रेल्वे विभागास सादर करण्यात आले.
उपक्रमाद्वारे प्राप्त होणारे दोन हजार यूनिक आयडी कार्ड आयआरसीटीसीद्वारे सवलत आधारित ई-तिकीट प्रमाणपत्र दिव्यांग बांधवांना घरपोच देणे, शहरी भागातील दिव्यांगांना शासकीय टपालाव्दारे, उपरोक्त योजनेची तपशील माहिती दिव्यांग बांधवांना व्हावी याकरिता योजनेचे माहितीपत्रक तयार करणे आदीबाबत जिल्हाधिकारी अश्वीन मुद् गल व मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने निर्देशित करण्यात आले आहे.