नागपूर/ प्रतिनिधी
भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) मधील सर्वच कर्मचारी संपावर गेले असून सोमवारपासून (दि.१८) पुढील ३ दिवसांचा हा देशव्यापी संप राहणार आहे. यामुळे संपाच्या या तीन दिवसांत बीएसएनएलचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती आहे. त्यात ३ दिवसांचा संप असल्याने व यामधात इंटरनेट सेवा सुरू न झाल्यास नागरिकांची मात्र चांगलीच फसगत होणार यात शंका नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध, सुनियोजित पद्धतीने, अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी आणि दलालांना फाटा देण्यासाठी परिवहन विभागाने ‘ऑनलाईन’ प्रणाली आत्मसात केली. परंतु इंटरनेट बंद असल्याने सर्वच व्यवहार विस्कळीत झाले होते. दुसरीकडे आरटीओ कार्यालयाच्या आत व परिसरात फोफावलेले अनधिकृत ‘ऑनलाईन सेंटर’. याच्या आड दलालांचा व्यवसाय जोरात सुरु होता.
आल इंडिया कर्मचारी संयुक्त मोर्चाच्यावतीने सोमवारपासून (दि.१८) बुधवारपर्यंत (दि.२०) ३ दिवसांचा हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संचार मंत्र्यांनी दिलेल्या वेतनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ४-जी स्पेक्ट्रम देण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची पूर्तता न केल्यामुळे बीएसएनएल ४-जी सेवा देऊ शकत नाही. करिता ४-जी स्पेक्ट्रम देण्यात यावे, कर्ज घेण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, इलेक्ट्रीक बील भरण्यासाठी निधी देण्यात यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, खासगी कंपन्यांना पुढे करण्यासाठी बीएसएनएलची फिक्सींग केली जात असल्याचेही कर्मचारी बोलत आहेत. या देशव्यापी संपामुळे मात्र बीएसएनएलचे संपूर्ण कामकाज पुढील ३ दिवस ठप्प राहणार आहे.