नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार पुढील वर्षी एप्रिल २०२० पासून उच्च दाब वीज ग्राहकांसाठी केव्हीएएच बिलिंग प्रणाली लागू करण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयात उच्चदाब वीज ग्राहकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरण नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी उपस्थित उच्चदाब वीज ग्राहकांना लागू होणाऱ्या नवीन पद्धतीची माहिती देऊन वीज ग्राहकांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे दिली. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार २० किलोवॅट वरील जोडभार असलेल्या वीज ग्राहकांसाठी १ एप्रिल २०२० पासून वरील पद्धतीने वीज देयकाची आकारणी करण्यात येणार आहे. या अगोदर उच्च दाब वीज ग्राहकाना केडब्लूएच पद्धतीने वीज देयकाची आकारणी करण्यात येत होती. वीजभार चांगला ठेवला तर प्रोत्साहन नाही तर दंड अशी पध्दत येत्या काळात बंद होणार आहे.
नवीन पद्धतीने देयकाची आकारणी केल्याने वीज यंत्रणेवरील असणारा भर हलका होण्यास मदत होणार असून उच्च दाब वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे.सोबतच वीज यंत्रणा सक्षम होणार आहे. परिणामी रोहित्रावरील ताण कमी होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी उपस्थित वीज ग्राहकांना दिली.