नवी दिल्ली :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ही व्याजदरवाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज ही माहिती दिली.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक आज गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ईपीएफवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्याजदरवाढीच्या प्रस्तावाला विश्वस्त मंडळाची मंजुरी मिळाली असून हा प्रस्ताव आता अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. तिथून मंजुरी मिळाल्यानंतर व्याजाचा लाभांश ईपीएफ खात्यांत जमा केला जाईल, असे नमूद करण्यात आले. या वाढीव व्याजदराचा लाभ तब्बल ६ कोटी ईपीएफ खातेधारकांना मिळणार आहे.