चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील वेगाने विकसित होणारा भाग म्हणजे तुकुम क्षेत्र. या भागातील गणेशनगर गणेश मंदिर परिसरात एका सांस्कृतिक सभागृह निर्मितीचा शब्द चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांनी दिला होता. या शब्दाची पूर्तता करत आज आ. शामकुळे यांच्या हस्ते 15 लाख रु. किंमतीच्या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी महापौर अंजली घोटेकर, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, मायताई उईके, शिलाताई चौहान, गणेशनगर कल्याणकारी समिती अध्यक्ष विनोद वझलवार, माजी नगरसेवक रमेश देशमुख आदींची उपस्थिती होती. श्री गणेश मंदिरात दर्शन करत मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजनाचा नारळ वाढविण्यात आला. जाहीर सोहळ्याचा प्रारंभ दीपप्रजवलंन करून झाला. गणेश नगर कल्याणकारी समितीच्या वतीने मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात आपले विचार मांडताना महापौर अंजली घोटेकर यांनी शहराच्या वेगवान विकासासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे सांगीतले तर नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांनी हे सभागृह परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व सुविधा युक्त आणि गुणवत्तापूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्या संबोधनातून आ. नाना शामकुळे यांनी सभागृह सुसज्ज होण्याच्या दृष्टीने आणखी 5 लाखांचा निधी घोषित केला. चंद्रपूर शहर व इथले नागरिक यांना दैवत मानून आपण विकासाची वाट चालत असून क्षेत्रातील नागरिकांचे असेच सहकार्य आगामी काळात देखील मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरेश धानोरकर यांनी केले. कार्यक्रमाला गणेशनगर परिसरातील नागरिक, महिला- पुरुषांची मोठीं उपस्थिती होती.