जिल्हाधिकार्यांनी दिले पोलीस प्रशासनाला कारवाईचे निर्देश
चंद्रपूर दि 28 फेबुवारी : बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत केवळ मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रसिद्धी अभियान राबविल्या जाते. मात्र काही ही खाजगी व्यक्ती व अशासकीय संस्था या योजनेअंतर्गत अशिक्षित पालकांकडून पैसे उकळत असल्याचे लक्षात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या परिसरात अशा पद्धतीच्या फसवणुकीला चालना देणाऱ्या असामाजिक तत्वांना ताब्यात घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या जन्माचा आदर समाजामध्ये व्हावा, यासाठी प्रचार व प्रसार यंत्रणा बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत राबविण्यात येते. या अभियाना अंतर्गत कुठल्याही आर्थिक मोबदल्याची तरतूद नाही. केंद्र व राज्य शासनाने यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद वा घोषणा केली नाही. मात्र जिल्ह्यातील काही भागांमध्ये हिंदी भाषेतील अर्ज घेऊन काही असामाजिक तत्व अशिक्षित पालकांना मुलींना दोन लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून पैसे उकळत असल्याचे व चुकीचे फॉर्म भरून घेत असल्याचे निर्देशास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यासंदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ, योजनेअंतर्गत मुलीचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीने गर्भवती मातांची नोंदणी, मुलींच्या जन्माचे स्वागत ,जनजागृती, वाढदिवस साजरा करणे, आरोग्य शिबिरे घेणे, मुलगी वाचवा मुलगी शिकवा याबाबत मार्गदर्शन करणे, पथनाट्य राबविणे, असे जागृती अभियान सुरू आहे. यामध्ये आर्थिक तरतुदीचा कुठलेही प्रावधान नाही त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये व अशा पद्धतीच्या आर्थिक मागणी करणाऱ्या समाजकंटकांची तक्रार पोलिसात करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.