नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिनी दिनांक २७/२/२०१९ रोजी १२ ते ५ या वेळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरवेला कॉलनी, नागपूर येथे 'भेट मराठी मनाची' या कार्यक्रमांतर्गत काव्यप्रेमी शिक्षकांच्या दुस-या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कथा, कादंबरीकार डॉ.रवींद्र शोभणे, अध्यक्ष म्हणून संपादक, लेखक श्री श्याम पेठकर व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण छांगाणी, प्रसिद्ध रंगकर्मी व नाट्य अभिनेत्री प्रणाली राऊत, सहसचिव पल्लवी पाटील, डॉ. गंगाधर वाळले, अधिव्याख्याता डायट चंद्रपूर, पत्रकार सूरज पाटील, सांकृतिक प्रतिनिधी प्रवीण खापरे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ सोहन चवरे, राज्य संघटक परसराम गोंडाणे इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे 'आम्ही काव्यस्तंभ' या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे व कवयित्री प्रतिमा नंदेश्वर यांच्या 'अर्पण', प्राजक्ता खांडेकर यांच्या 'कस्तुरीगंध' संग्राम कुमठेकर यांच्या 'शोध सत्याचा', विजय धोत्रे यांच्या 'स्वप्नकिनारा' काव्यसंग्रहाचे तसेच मराठी भाषा गौरव दिन विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे जागतिक मराठी भाषा गौरव दिनी राज्यातील मराठी भाषा संवर्धन, सक्षमीकरणासाठी कार्य करणा-या १४ सदस्यांना 'जीवन गौरव' तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दुपार सत्रात यवतमाळचे ज्येष्ठ कवी नागोराव कोंपलवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कवी संमेलनात राज्यातील निवडक ७५ निमंत्रीत कवि कवयित्रींना 'काव्यस्तंभ' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नागपूर येथील इच्छूक कवींना काव्यवाचनाची या संमेलनात निमंत्रीतांच्या कवी संमेलनानंतर संधी देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.