चंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये अधिक उद्योजकता निर्माण करावी यासाठी हिरकणी योजनेची घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारी पासून तालुकास्तरीय आयोजनाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्यावतीने महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मुंबई येथील मंत्रालयातील वार रूममध्ये यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, अकोला येथून कौशल विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, संबंधित विभागाचे सचिव असीम गुप्ता, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आदी सहभागी झाले होते.
राज्य शासनामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरुवात आज करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या 10 बचत गटांची निवड केली जाणार आहे. या बचत गटांना आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय उत्तम काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील चांगल्या बचत गटांना केंद्र पातळीवर काम करण्याची संधी देखील दिली जाईल, असेही आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुरेश प्रभू यांनी जाहीर केले.
चंद्रपूर येथून संपर्क साधताना महापौर अंजली घोटेकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महिला बचत गटांसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. महिला बचत गटांसाठी ही एक नवीन संधी असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे महिला बचत गटांचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हिरकणी योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांचा सहभाग नोंदविण्याबाबत यापूर्वी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बचत गट अतिशय सक्षमतेने काम करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी देखील केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील यावेळी घोटेकर यांनी केले.आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भैय्यासाहेब येरमे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.