पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आढावा बैठकीत निर्देश
मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. फ्लोराईड युक्त पाणी पिणे हि गंभीर बाब असून यापुढे एकही व्यक्ती फ्लोराईडचे पाणी पिणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्हा ‘मॉडेल फ्लोराईड मुक्त’ करा असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.
मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे फ्लोराईड मुक्त चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. फ्लोराईड मुक्त चंद्रपूर जिल्हा करण्यासाठी या आढावा बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रादेशिक योजना जुन्या झाल्याने त्याची दुरुस्ती, पाईप लाईन, पंप ईत्यादीसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 35 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना विद्युत वरून सौर उर्जेवर रुपांतरीत करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. याशिवाय प्रादेशिक योजनेतील प्रत्येक गावातील पाण्याच्या टाकीजवळ बल्क मीटर बसवावे. फ्लोराईड बाधित गावे 25% व त्यापेक्षा जास्त स्त्रोत गावांमध्ये डी-फ्लोराईड युनिट बसवा, फ्लोराईड बाधित गावांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी,प्रादेशिक योजनांच्या देखभालीकरीता 4 कोटीचा निधी तर जिल्हातील नादुरुस्त शौचालयासाठी 5 कोटी रु. निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अश्या सूचना देखील पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यात. कोळसा खाणीमुळे पाण्याच्या स्तरातील होणाऱ्या बदलासाठी निरीला पत्र देण्याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकिला प्रामुख्याने वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पजारे यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते.
24 आदर्श गाव पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सादर करा...
चंद्रपूर जिल्ह्यातील 24 आदर्श गावांचा पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव येत्या 15 दिवसात तातडीने तयार करून सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आजच्या आढावा बैठकीत दिले. आरओ युक्त जिल्हा होण्याचे दृष्टीने महत्त्वाचे पाउल राहील. त्यादृष्टीने राज्यातल्या उत्तम कंपन्या व एजंसी मार्फत सदर कामे दर्जेदार करण्यात यावी. ह्या कामात कुठलीही हयगय होता कामा नये शिवाय उत्तम गुणवत्ता पूर्ण आरओ बसविण्याचे निर्देशही त्यांनी सबंधित विभागाला दिले.