पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवली हिरवी झेंडी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
मुल ते नागपूर या शिवशाही वातानुकूलित बस सेवेची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल बसस्थानकावरून केली. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत त्यांनी या बसच्या पहिल्या प्रवासाला शुभेच्छा दिल्यात.
मुल येथून दररोज सकाळी 11 वाजता व रात्री 7 वाजता ही बस नागपूरकडे प्रवास करणार आहे. मुल ते नागपूर या प्रवासादरम्यान सिंदेवाही , नागभिड, कांपा, भिवापूर ,उमरेड याठिकाणी या बसला थांबा देण्यात आला आहे .नागपुर वरून ही बस दररोज सकाळी 7 वाजता व दुपारी 3 वाजता सुटणार आहे.
राज्याच्या सर्वदूर भागात शिवशाहीया वातानुकूलित प्रवासाचा लाभ ग्रामीण भागातील जनतेलाही मिळायला हवा, तसेच मुल ते नागपूर हा प्रवास जलद व सुलभ व्हावा यासाठी नागरिकांची मागणी होती. त्यानंतर ही बस सुरू करण्यात आली आहे. मुल येथील बसस्थानकाचे काम देखील प्रगतीपथावर असून आगामी काळात नव्या कोऱ्या करकरीत बसेस ग्रामीण भागातील जनतेला प्रवासासाठी मिळतील , असे यावेळी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. बसस्थानकावर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमांमध्ये बसने प्रवास करणारी कोरपना येथील विद्यार्थिनी कल्याणी प्रमोद महाडोरे हीच्याहस्ते फीत कापून या बसच्या प्रवासाला सुरुवात झाली.
बसस्थानकावरील या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवराव भोंगळे ,मुल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपमहापौर नंदू रणदिवे आदी उपस्थित होते. तसेच एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक पंचभाई चंद्रपूरचे विभाग नियंत्रक आर. एन.पाटील, नागपूरचे विभाग नियंत्रक के .एल .वरठे चंद्रपूरचे यंत्र अभियंता हेडाऊ ,चंद्रपूरचे आगार व्यवस्थापक एस.बी. डफडे आदी उपस्थित होते.