Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १५, २०१८

देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या पहिल्या तपासणी केंद्राचे मूलमध्ये लोकार्पण

  • उपचारासोबतच तीन चाकी सायकली, व्हीलचेअर व
  • साहित्याचे वाटप करण्याची मुनगंटीवार यांची घोषणा
  • पोभुर्णा येथेही लवकरच ज्येष्ठांचे तपासणी रुग्णालय
  • वनविकास महामंडळाकडून 60 लाखांची मदत जाहीर
मूल ( चंद्रपूर ) /प्रतिनिधी: - ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत करण्यापासून तर त्यांची देखभाल करणाऱ्या कुटुंबाच्या जाणिवांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यापर्यंत तसेच सर्वेक्षण व विश्लेषण करून त्यांच्या आरोग्यासाठी योग्य उपाययोजना निर्माण करणारी यंत्रणा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे सुरू करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या पहिल्या केंद्राचे राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.
महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, टाटा ट्रस्टस् व जनसेवा ग्रामीण विकास प्रशिक्षण प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेमार्फत हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला आहे. तेलंगणातील मेदक, कर्नाटकातील यादगीर व महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुक्याची यासाठी टाटा ट्रस्टस् ने निवड केली आहे. मुल या ठिकाणी हा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर तेलंगाणा व कर्नाटक राज्यात हा प्रकल्प सुरु होणार आहे. आज या लोकार्पण सोहळ्याला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, टाटा ट्रस्टस् चे सचिव तथा मुख्य वीत्त अधिकारी आशिष देशपांडे, परेश जयश्री मनोहर, मुल नगरपालिकेचे अध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड आदी उपस्थित होते.
टाटा ट्रस्टस् व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एका सामंजस्य करारानुसार मूल येथील हे राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा अभियानांतर्गत पहिले पथदर्शी केंद्र उभे राहत आहेत. 2010-11 पासून केंद्र सरकारने वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य जनजागृती मोहीम सुरू केली आहे. टाटा ट्रस्टस् वयोवृद्ध लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून काम करते. नुकताच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये मुल येथे हे पहिले पथदर्शी केंद्र उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत मूल येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कक्ष उभारण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेमध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनसुविधेला बळकट करणे, प्रशिक्षित करणे व नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, यासाठी टाटा ट्रस्ट च्या मदत करीत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज याठिकाणी उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक मधुकरराव पिपरे यांच्या ह्स्ते रोग निदान कक्षाचे उद्घाटन केले.
तालुक्यातून यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, केवळ आरोग्य तपासणे हे या केंद्राचे उद्दिष्ट नसून या भागातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणाऱ्या आजाराचे विश्लेषण करणे व त्याची उपायोजना सुचविण्याचे काम देखील या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी तपासणी सोबतच औषधोपचार, शस्त्रक्रिया आणि सोबतच वार्धक्य सुकर व्हावे यासाठी गरज पडणारे पूरक साहित्य जसे तीन चाकी सायकली, व्हीलचेअर, काठी आदी पूरक साहित्याचे देखील तालुक्यामध्ये वाटप केले जाईल.
ते म्हणाले, जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेकडे आपल्या काळात आपण विशेष लक्ष दिले असून केवळ ज्येष्ठांना नव्हे तर सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी चंद्रपूरमध्ये एम्सच्या धर्तीवर अद्ययावत मेडिकल कॉलेज उभे राहत आहे. टाटा ट्रस्ट च्या मदतीने जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटल उभे राहत आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्याठिकाणी ॲम्बुलन्स देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय उत्तम दर्जाचे तयार करण्यात येत आहे. आगामी काळात 27 सप्टेंबर पासून जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मदतीने आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य तपासणी मध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये आढळणाऱ्या आजाराचे विश्लेषण करून त्या दृष्टीने एक मोठी आरोग्य यंत्रणा व उपचार यंत्रणा या जिल्ह्यांमध्ये उभारली जाणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केवळ आरोग्य या घटकाकडे अकराशे कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाल्याचे स्पष्ट केले. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी 60 लाख लक्ष रूपये या प्रकल्पात आरोग्य सुविधांसाठी दिले असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सोनल सावरडेकर यांनी केले. यावेळी टाटा ट्रस्टचे परेश जयश्री मनोहर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखील मार्गदर्शन केले. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू होत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. संचालन सचिन फुलझेले यांनी केले.
तत्पूर्वी टाटा ट्रस्टस् चे सचिव तथा मुख्य वित्त अधिकारी आशिष देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, या ठिकाणी मिळणारी आरोग्य सुविधा ही सहज, सुलभ, सर्वसमावेषक आणि व्यक्तिगत काळजी घेणारी असेल. तसेच खर्चिक नसेल. ज्येष्‍ठांच्या मानसिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी ही यंत्रणा काम करेल. आमची संस्था ही ज्येष्ठ नागरिकांना आनंदी आणि आरोग्यदायी जीवन मिळावे यासाठीच वैद्यकीय सेवा उपलब्ध करीत असल्याचे स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.