- सिध्दार्थ नगरात केंद्रीय गृहराज्यमंत्रयांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना वर्षोनुवर्षे मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी राबविली जात आहे. शासन आणि प्रशासन यासाठी कृतीशीलपणे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र हे देशातील असे राज्य ठरले आहे की, या राज्यात वृक्षारोपणाने लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे लोकांनी स्वीकारले आहे. त्यामुळे शासन स्तरावरून राबविण्यात येणा-या वृक्षारोपन कार्यक्रमात लाखो हात पुढे येत वृक्षारोपणाचे उद्दीष्ट साध्य करू लागले आहेत. वृक्षारोपण हे सजीव सृष्टीकरिता उपकारक ठरणार असल्याने प्रत्येकाने या चळवळीचा धागा बनून वृक्षारोपणाच्या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले पाहिजे असे विचार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
वेकोलि चंद्रपूर क्षेत्र च्या वतीने बायपास मार्गावरील सिध्दार्थ नगर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, वेकोलिचे क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह, भाजप नेते खुशाल बोंडे, नगरसेवक संदीप आवारी, श्याम कनकम, रवि आसवानी, नगरसेवीका कल्पना बगुलकर, ज्योती गेडाम, सामाजिक कार्यकर्ते दामोदर मंत्री, राजू घरोटे, डाॅ. मंगेश गुलवाडे, डाॅ. भुपेश भलमे, संदीप आगलावे, वेकोलिचे गणपत राव, फनेंद्र यांची विशेष उपस्थिती होती.
वृक्ष आपणास मोफत प्राणवायू देतात रूग्णालयात यासाठी आपणास पैसे मोजावे लागतात. वाढते प्रदुषण, उष्मावृध्दी यावर झाडांमुळेच नियंत्रण घालणे शक्य असल्याने समाजातील प्रत्येक व्यक्तीने कर्तव्य भावनेतुन वृक्षारोपण केले पाहिजे व या झाडांची निगा राखली पाहिजे. आज या ठिकाणी होत असलेल्या वृक्षांचे संरक्षण, संवर्धन व निगा राखण्याची जबाबदारी या परिसरातील नागरिकांची व युवकांची आहे. हे कार्य ते पार पाडतील असा विश्वास ना. हंसराज अहीर यांनी याप्रसंगी व्यक्त केला. केवळ एक दिवस वृक्षारोपण करणे ही भुमिका नसावी तर याला सातत्य लाभले पाहिजे. राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यापूर्वी त्यांनी संकल्पपूर्ती केली असून आता हे आव्हानही जनतेच्या सहकार्यातून पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. नानाभाऊ शामकुळे यांनी वृक्षारोपनाचे महत्व विषद करीत वृक्ष हेच आम्हासाठी सगे, सोयरे आहेत असे संतवचन असल्याने प्रत्येकांनी वृक्षारोपनाच्या चळवळीचा भाग बनत वृक्षदुताचे कार्य पार पाडावे, शासनाने वृक्ष चळवळीवर विशेष भर दिला असून आता 13 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य स्वयस्फूर्तीने पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी आपले मौलिक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमात महापौर सौ. अंजली घोटेकर, क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह यांनीही वृक्षारोपण व जनतेचा सहभाग यावर विचार व्यक्त केले. या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी दिलीप सेंगारप, गणेश गेडाम, संजय मिसलवार, तेजा सिंह, रामलु भंडारी, विनोद लभाने, पराग मलोडे, विनोद धकाते, दौलत नगराळे, सोनकुसरे, शुभम दयालवार, कुणाल गुंडावार व सिध्दार्थनगर येथील नागरिकांची उपस्थिती होती.