विद्यार्थ्यांना दिले वृक्षरोपण व संवर्धनाचे धडे;वृक्ष माझा सांगाती एक अभिनव उपक्रम
लहान मुल ही देवा घरची फुले असे म्हणतात. शाळेतील बालगोपाळांवर सुध्दा शालेय जीवनापासून वृक्षाचे महत्त्व पटवून दिल्यास उद्याची वृक्षसंवर्धन करणारी संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वच्छता व वृक्षदिंडीसह जिवती तालुक्यात भ्रमंती करतांना, जिवती तालुक्यातील चिखली या गावातील शालेय विद्यार्थ्यांशी हितगुज करून वृक्षाचे आपल्या जिवनात काय महत्त्व आहे हे पटवून देण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांचा वृक्षारोपण मोहिमेत शाश्वत सहभाग वाढावा व खऱ्या अर्थाने वृक्षाची जोपासणा व्हावी यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून ̎̎वृक्ष माझा सांगाती ̎̎ हा अभिनव उपक्रम राबवित असून, या उपक्रमाद्वारा शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करून एक वृक्ष चार वर्षाकरीता दत्तक म्हणून जबाबदारी दिल्या जाणार आहे. यासह प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा वृक्षाचे निरीक्षण करून, वृक्षाची होणारी वाढ या विषयाच्या नोंदी चार वर्षाच्या रिपोर्ट कार्ड मध्ये नोंदवायच्या आहे. या विशेष उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कार्यानूभव या विषयात पाच गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
भावी पिढीला पर्यावरण पुरक वातावरण निर्माण करण्याकरीता आजचा शालेय विद्यार्थी वृक्षसंवर्धन मोहिमेतील महत्त्वाचा घटक आहे. माणसाच्या जन्मापासून तर जिवनाच्या शेवटच्या घटकापर्यंत वृक्ष कसा साथ देतो या विषयी विविध उदाहरणांचे दाखले देत अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्हयात स्वच्छता व वृक्षलागवडीच्या वातावरण निर्मीती करीता जिल्हा परिषद अध्यक्ष गावा-गावात जावून विविधांगी मार्गाने ग्रामस्थानांना वृक्षलागवडी विषयीची विनंती करीत आहेत. जिवती तालुक्यात दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी स्वच्छता व वृक्षदिंडीसह महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ. अर्चना जिवताडे, जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकाने, सुरेश केंद्रे, पोंभूर्णा पंचायत समितीचे सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.