मागील आठवडाभर सतत चंद्रपूर शहरासह इतर भागामध्ये चांगला पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. तसेच गेल्या 2 दिवस चंद्रपूर शहरात झालेल्या रस्ते अपघाताच्या प्रकरणी मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीने अर्थसहाय्य देण्यात यावे तसेच शहरातील मुख्य रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर आणि सार्वजननिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांना दिले आहेत.
शहरात झालेल्या रस्ते अपघातात गेलेले बळी या अतिशय दुर्देवी घटना असून या घटनांची पुनरावृत्ती होवू नये, या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे कडक निर्देश पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रशासनाला दिले आहेत.