संग्रहित |
चंद्रपूर/प्रतिनिधी:
६ ग्रामस्थांना ठार केलेल्या दहशदखोर वाघाला पिंजराबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागात सिंदेवाही परिसरात गेले काही दिवस एका वाघाने चांगलीच दहशत पसरविली होती. किन्ही, मुरमाडी , लाडबोरी भागात या वाघाने शेतशिवार कामे करणा-या आणि जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या 6 ग्रामस्थांना ठार केले होते तर ३ ग्रामस्थांना जबर जखमी केले होते. या घटनेनंतर वाघाला पकडण्यासाठी वनविभाग मोठे अभियान राबवित होते. लोकांचा रोष बघता या वाघाला पकडने वनविभागाची महत्वाचे होते,या संपूर्ण घटनेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याने या वाघाचा बंदिबस्त करण्याच्या सूचना वनाधिका-याना दिल्या होत्या.याच प्रयत्नात रविवारी संध्याकाळच्या सुमारास सिंदेवाही जंगलातील कक्ष क्रमांक १३३४ मध्ये वन विभागाच्या पथकाने या वाघाला बेशुद्ध करत त्याचा ताबा मिळविला.विशेष म्हणजे या वाघाला पकडण्यासाठी जंगल परिसरात वनविभागाने कॅमेरे लावून तब्बल ४० वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची या वाघावर पाळत होती.हा दीड ते २ वर्षाचा नर वाघ असून त्याची तातडीने चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यातच या वाघाची दहशत असल्याने स्थानिक नागरिक संतापले होते. वाघ पिंजराबंद झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.