इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या एका वितरकाने आर्थिक कोंडीमुळे उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर लोकमत चौकाजवळ हा थरारक प्रकार घडला.
शिरीष लक्ष्मणराव मोघे (वय ५१) असे मृताचे नाव आहे. ते पांडे लेआऊट खामला येथील गणेशपौर्णिमा अपार्टमेंटमध्ये राहत होते. मोघे टीव्ही, फ्रीज आणि अन्य विजेवर चालणाऱ्या उपकरणांचे वितरक होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. या पार्श्वभूमीवर ते त्यांची कार क्रमांक एमएच ३१/ सीएस ७४३६ ने झिरो माईलकडून शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर चढले. त्यांनी लोकमत चौकाजवळ आपली कार उभी केली आणि कठड्यावर चढून त्यांनी पुलावरून खाली उडी घेतली. ते खाली रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरड केली. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळेतच गस्तीवरील पोलीस वाहन पोहचले. मोघेंना उचलून धंतोलीतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. धंतोलीच्या उपनिरीक्षक सरिता यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचल्या. कारमधील कागदपत्रांवरून ती शिरीष मोघे यांच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबत संपर्क केला. दरम्यान, उपचार सुरू असताना आज पहाटे ४ च्या सुमारास मोघे यांनी प्राण सोडला. त्यांचे बंधू श्रीकांत मोघे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.