आदिवासी बहुल असणा-या चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पुढाकारात गिर्यारोहण क्षेत्रात चंद्रपूरचे नाव आता सन्मानाने घेतले जाणार आहे. कठोर प्रशिक्षणानंतर 50 आदिवासी मुलांमधील 10 प्रशिक्षित मुले चंद्रपूरचा झेंडा घेऊन एव्हरेस्ट सर करायला निघाले आहेत. 8 एप्रिल 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांसह प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये हा शुभेच्छा कार्यक्रम होणार आहे.
चंद्रपूरातील सर्व आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षित 10 आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्टकडे कूच करण्यासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. गिर्यारोहण क्षेत्रात जंगलातील काटकता अंगी असणा-या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन संधी या कार्यक्रमातून उपलब्ध होणार असून त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या खडतर, साहसी आणि परिश्रमाच्या मोहिमेला मिशन शौर्य नाव देण्यात आले आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा अणि आदिवासी विकास राज्यमंत्री राजेअम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती राहणार आहे.
गेल्या वर्षभरापासून या संदर्भात आदिवासी विकास विभागामार्फत प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये या मोहिमेची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली होती. चंद्रपूर जिल्हयातील बोर्डा, देवाडा, जिवती येथील शासकीय आश्रम शाळामधील 50 इच्छुक विद्यार्थ्यांना वर्धा येथे गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे विद्यार्थ्यांना निवासी प्रशिक्षण देण्यात आले.
या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम होऊ नये, यासाठी शहरालगतच्या बोर्डा येथील आश्राम शाळेत मुलांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर भोणगिरी हैद्राबाद येथे गिर्यारोहण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तर त्यापुढील प्रशिक्षणासाठी हिमालय, माऊंटेनिअरींग इन्स्टिटयुट दार्जिंलींग येथे 18 हजार फूट उंचिवरील गिर्यारोहणाचे 25 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात अ श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना लेह येथे एक आठवडयाचे ॲडव्हान्स विंटर ट्रेनिंग देण्यात आले. शेवटी प्रशिक्षणात अव्वल ठरलेल्या 10 जीगरबाज चंद्रपूरकर विद्यार्थ्यांची माऊंट एव्हरेस्टसर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
यामध्ये 7 मुले व 3 मुलींचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पावर आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा मिश्रा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या मार्गदर्शनात सद्या गोंदिया जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले व तत्कालीन चंद्रपूर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एम.आर. दयानिधी यांनी लक्ष वेधले असून हा प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे
पालकमंत्री विद्यार्थ्यांना टॅब गिफ्ट देणार
मोहिमेवर जाणार सर्व विद्यार्थ्याना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ऑद्यिनिक काळात संपर्काचे प्रमुख माध्यम असणाऱ्या टॅबची भेट दिली जाणार आहे.या मोहिमेवर अकाश मडावी, शुंभम पेंदोर, छाया आत्राम,इंदू कन्नाके, कविदास काटमोडे, मनिषा धुर्वे, प्रमेश आडे,अक्षय आत्राम, उमाकांत मडावी, विकास सोयाम,हे विद्यार्थी जाणार आहेत,त्यांना सर्वाना संपर्कासाठी हे टॅब पालकमंत्री प्रदान करणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक केशव बावणकर यांनी दिले आहे