मुलींनी कमी कपड्यांचे अंग प्रदर्शन न करता,अधिक प्रमाणात कपड्यांचा पेहराव करावा, तुमच्याकडे पाहिल्यानंतर‘माय’ आठवली पाहिजे, समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन शुद्ध राहील, अनुचित प्रकार कमी होतील असे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले. महानिर्मितीच्या प्रकाशगड मुख्यालय मुंबई येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव,श्याम वर्धने,संतोष आंबेरकर, कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, कैलाश चिरूटकर, राजू बुरडे, प्रदीप शिंगाडे, महावितरणचे चंद्रशेखर येरमे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी सिंधुताईंनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. महिलांनी आई होणे शिकले पाहिजे म्हणजे इतरांच्या चुका माफ करणे शक्य होईल. जीवनामध्ये पुरुष-महिला समन्वय असणे गरजेचे आहे. स्त्री हि जननी, माता असल्याने तिच्यात निर्मिती,संस्कृती आणि सृजनात्मक गुण आहेत. महिलांसाठी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत, महिलांनी विकासाचा ध्यास उरी बाळगावा असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून विनोद बोंदरे म्हणाले कि,सिंधुताईंचा प्रवास हा संघर्षमय आणि प्रेरणादायी असल्याने त्यांच्या अभूतपूर्व कार्याची महती महानिर्मितीच्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना व्हावी यादृष्टीने हे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून बिपीन श्रीमाळी म्हणाले कि, महिलांचे समाजामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, घर-संसार,बाजार आणि व्यवसाय समर्थपणे सांभाळण्याचे सामर्थ्य स्त्री मध्ये आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी महिलांचा यथायोग्य सन्मान झाला पाहिजे. महानिर्मितीमध्ये आज सिंधुताई आल्या हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली चुगडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रियंका उगले यांनी केले. याप्रसंगी महानिर्मितीचे मुख्य अभियंते चंद्रशेखर सवाईतुल, विजय माहुलकर, मारोती भंडरवाड, महानिर्मितीच्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांद्वारे आयोजित या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाला महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.