मार्च 2018 मध्ये विधीमंडळात सादर होणा-या राज्य शासनाच्या सन 2018-19 च्या अर्थसंकल्पासाठी राज्यातील जनतेने, विविध क्षेत्रातील जाणकार तज्ञांनी सुचना कळविण्याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
मार्च 2015, मार्च 2016 आणि मार्च 2017 मध्ये विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आम्ही राज्यातील जनतेकडून सुचना मागविल्या होत्या. विविध क्षेत्रातील जाणकार, तज्ञांकडून प्राप्त सुचनांचा आदर करत तीन अर्थसंकल्प आम्ही राज्यासमोर मांडले. कृषी क्षेत्रात अनेक समस्या असताना 12.5 टक्के एवढी वृध्दी कृषी विकासदरात झाली तर वार्षीक सकल उत्पन्न अर्थात जीडीपी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.4 टक्क्यांपर्यंत नेत महाराष्ट्राने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. 34 हजार 22 कोटीची ऐतिहासिक कर्जमुक्तीची भेट आपण बळीराजाला दिली आहे. राज्याच्या विकासाची दिशा निश्चीत करताना राज्यातील जनतेच्या सुचनांचा, तज्ञांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला झाला व तो यापूढेही होईल याचा विश्वास आहे. राज्याच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा एखादी वैशिष्टयपूर्ण योजना तयार करण्यासाठी जनतेच्या मौलीक सुचना प्राप्त झाल्यास त्या माध्यमातुन विकासाभिमुख, लोकाभिमुख अर्थसंकल्प तयार करणे सोईचे ठरेल. यादृष्टीने 31 जानेवारी 2018 पर्यंत आपल्या सुचना वित्त व नियोजन मंत्री कार्यालय, मुंबई या पत्त्यावर किंवा min.finance@maharashtra.gov.in / min.forest@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.