शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर बेरोजगार
कामगारांचा झाडू मोर्चा व हल्लाबोल
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शेकडो
सफाई कामगार महिलांना शासनाने कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आल्याने शनिवारी संतप्त महिलांनी शहरातील जटपुरा गेट येथून नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर झाडू मोर्चा व हल्लाबोल मोर्चा काढला.
गेल्या १० वर्षांपासून या महिलांनी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोलाचे योगदान दिले. आम्हीच गोर गरीब रुग्णाची सेवा केली शिक्षा आम्ही कामावरून हकालपट्टी करून दिली . या कामावरून कमी केलेल्यांपैकी अनेक विधवा महिला असून त्याच त्यांच्या कुटुंबातील एकमेव आधार असलेल्याने त्यांना कामावरून कमी केल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, जिल्ह्यात दोन हायकमांड मंत्री आहेत मात्र आमच्या समस्सेकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे व ज्यांचे आधी झोपडे होते ते लोक ह्याच अवैध दारू विक्रीतून धनदांडगे बनत इमारती बांधत आहेत,आम्हाला कामावरून कमी केल्याने आता "आम्ही भीक मागायची कि जिल्ह्यात अवैध दारू विकायची" असा प्रश्न उपस्थित आंदोलनकारी महिलांनी प्रशासनाला विचारला आहे.