- महाराष्ट्र व गोवा राज्यातील क्षेत्रीय प्रचार अधिकारी व कर्मचा-यांचा कार्यशाळेत सहभाग
नागपूर, - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणा-या क्षेत्रीय प्रचार संचालनलयाच्या पुणे विभागीय कार्यालयातर्फे नागपूरातील स्थानिक हॉटेल तुली इंपेरियल येथे ‘कृषी व कृषी कल्याण योजनावर’ आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे संचालक डॉ. वी. एन. वाघमारे तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय लिंबू बर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यावेळी उपस्थित होते. क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या पुणे व रायपूर विभागाच्या अतिरिक्त महासंचालिका श्रीमती मोनीदीपा मुखर्जी, जैविक शेती केंद्र, नागपूर क्षेत्रीय संचालक डॉ. ए.एस. राजपूत, आदर्श ग्राम योजनेचे पुणे येथील तांत्रिक अधिकारी श्री. रविकांत गौतमी व पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे विस्तार अधिकारी श्री. नवलाखे यावेळी उद्घाटकीय सत्रास प्रामुख्याने उपस्थित होते.
यवतमाळ व इतर जिल्हयात कापूस पीकावर कीटकनाशकाच्या फवारणीमूळे शेतक-यांच्या मृत्यूबद्दल केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉ. वाघमारे यांनी किटकनाशकांचा अमर्यादित वापर कारणीभूत असल्याचे सांगितले. बोंडअळी.(बोल-वर्म) व रस शोषक अळी (व्हाईट-फ्लाय)चा प्रादुर्भाव पीकांवर एका ‘थ्रेश-होल्ड’ पातळीच्या पुढे गेल्यानंतरच पीकांवर कीटकनाशाची फवारणी करावी लागते, पंरतु, शेतकरी कीडीचा प्रादुर्भाव पडण्या ]अगोदरच पंपाच्या साहाय्याने फवारणी करतात. यामुळे बोंड अळी, रस शोषणारी अळीचा नाश होतो परंतु सोबतच या अळयांना रोखणा-या ‘मैत्री अळींचाही’ नाश होतो. यामुळे शेतक-यांनी फवारणी करण्याअगोदर पीकावरील कीडीची थ्रेश-होल्ड पातळीची पाहणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. वाघमारे यांनी या कार्यशाळेत सुचविले. केंद्रीय कापूस संशोधन, नागपूरतर्फे संशोधन, प्रात्यक्षिके व विस्तार कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये राबवले जातात. कृषी विषयक योजना शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत क्षेत्रीय प्रचारकांची भूमिका या अनुषंगाने महत्वाची आहे याकडे
डॉ. वाघमारे यांनी लक्ष वेधले.
शेतक-यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त नसल्याने संशोधन संस्था व कृषी विदयापीठातर्फे केलेले संशोधन कार्य त्यांना समजेल अशा सुलभ भाषेत सांगणे महत्वाचे आहे. याकरिता क्षेत्रीय प्रचार संचालनलयाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे जन-जागृतीचे केले जाणारे कार्य कौतुकास्पद बाब असल्याचे केंद्रीय लिंबु-वर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. लदानिया यांनी स्पष्ट केले या संशोधन केंद्रातर्फे 100 पेक्षा जास्त प्रात्यक्षिके शेतांमध्ये केली गेली असून या केंद्रातर्फे
शेतक-यांना लिंबुर्गीय पीकांच्या लागवडी संदर्भात प्रशिक्षणही दिले जाते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
क्षेत्रीय प्रचार संचालनालय, रायपूर व पुणेच्या अतिरिक्त महासंचालिका श्रीमती मोनीदीपा मुखर्जी यांनी क्षेत्रीय प्रचार संचालनालय प्रथमच कृषी मंत्रालयाकरिता विशेष प्रचार अभियानाचा भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करत असल्याचे सांगितले. कृषी-विषयक योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच प्रत्यक्ष–फिल्ड वर जाऊन त्यांना या योजने संदर्भात शेतक-यांना अवगत करणे, क्षेत्रीय प्रचारकांची जबाबदारी आहे. कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव घेणे आवश्यक असून मोबाईलव्दारे शेतक-यांना ‘ई-नाम’या ऑनलाईन बाजारपेठ सेवेचा लाभ घेता येणे शक्य आहे, यामूळे कृषी क्षेत्रातील विपणन श्रुंखलेतील दलालीला आळा बसेल, अशी अपेक्षा श्रीमती मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केली.
नागपूर येथील गौंडखेरी स्थित जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजपूत यांनी जैविक पद्धतीने कीड नियंत्रण केल्यास शेतक-यांना कीटनाशकाचा वापर करण्याची गरज भासणार नाही, असे सांगितले. या कार्यशाळेत तांत्रिक सत्रामध्ये केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमि उपयोग नियोजन संस्था, नागपूर व कृषी विभाग नागपूर येथील अधिका-यांतर्फे कापूस माहिती तंत्रज्ञान व प्रसार, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मृदा सर्वेक्षणाचे कृषी मध्ये महत्व, पंतप्रधान पीक विमा योजना, सिंचन योजना या विषयांवर व्याख्यान देण्यात आली. उद्घाटकीय सत्राचे सूत्रसंचालन नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. मनोज सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. पराग मांडळे यांनी केले.या कार्यशाळेला अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. माधव जायभाये, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातील क्षेत्रीय प्रचार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.