‘स्पार्क’ मध्ये घडत आहेत नवीन सामाजिक कार्यकर्ते; प्लेसमेंटची संधी
गडचिरोली – सर्च आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संलग्नतेने महात्मा गांधीजींच्या नई तालीमवर आधारीत स्पार्क हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षी राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्पार्कच्या माध्यमातून सामाजिक कार्याचे धडे घेतले.
संपूर्ण भारतात व विशेषतः महाराष्ट्राच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखूची समस्या मोठी आहे. या समस्येवर समग्र पद्धतीच्या कामासाठी प्रेरणा, क्षमता व कौशल्य असलेले मनुष्यबळ उपलब्ध नाही म्हणून चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील गरजानुसार डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत सर्च आणि गोंडवाना विद्यापीठाने मागील वर्षीपासून गांधीजींच्या नई तालीमवर आधारीत स्पार्क हा एक वर्षाचा पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. काम करा, कमवा व शिका असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. स्पार्कचे पहिले वर्ष येत्या 31 जूलै 2023 ला पूर्ण होणार असून 1 ऑगस्ट 2023 पासून पूढचे सत्र सुरू होणार आहे. पूढच्या सत्रासाठी 27 जून ते 15 जूलै पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्रातील दारू आणि तंबाखूची समस्या कमी करण्यासाठी विशेष कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती करणे, यशस्वी उमेदवारांना संबंधित संस्था आणि उद्योगांमध्ये प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.
गांधीजींची ‘नई तालीम’ ही शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचे ध्येय्य बाळगणारी आहे. मन, बुद्धी, शरीर यांच्या संतुलित आणि सुसंवादित्व साधणारी जीवनकेंद्री आणि सद्गुणांचा सर्वोत्तम विकास व जबाबदार नागरिकत्वाची जडणघडणावर भर देणारी ही शिक्षण पद्धती आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तीपथ अभियानात प्रत्यक्ष काम करता करता क्षमता व कौशल्य विकसीत करणे हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
सामाजिक प्रश्न कसे सोडवावे, समुदायातील व्यसनाचे प्रमाण कसे मोजावे, आरोग्यविषयक संदेश साहित्य व वापर करणे, लोकांचे संघटन करणे, अहिंसक सामाजिक कृती, प्रशासनासोबत काम करणे, व्यसन उपचार व पाठपुरावा, कार्यक्रमांचे मुल्यांकन अशा विविध घटकांचा अभ्यास व प्रशिक्षण स्पार्कमधून दिले जाते.
अंतिम परीक्षेनंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सर्च व गोंडवाना विद्यापीठाद्वारे संयुक्त रित्या पी.जी. डिप्लोमा देण्यात येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी कामाच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होतील.
या अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक मंडळात डॉ. अभय बंग, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विवेक सावंत, डॉ. विक्रम पटेल, डॉ. शालिनी भरत, डॉ. सुदर्शन अय्यंगार हे आहेत.
सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे हे अभ्यासक्रमाचे संयोजक असून मुक्तीपथ चे संचालक तपोजय मुखर्जी ,उपसंचालक संतोष सावळकर, व प्रा. डॉ. शशिकांत आसवले यांच्या समितीच्या देखरेखीखाली हा अभ्यासक्रम सुरू आहे.