बाजार समिती निकालानंतर नानाजी तुपट यांचा राजीनामा मंजूर
प्रतिनिधी/ब्रम्हपुरी : () कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदान दिनी काँग्रेसचे किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्यावर मनमानीपणाचा खापर फोडत अध्यक्षपदाचा राजीनामा तिडके यांच्याकडे दिला होता. यामुळे काँग्रेस गोठ्यात खळबळ उडाली होती. बाजार समितीचा निकाल लागताच तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी नानाजी तुपट यांचा राजीनामा मंजूर केला असून पक्षश्रेष्ठी कडे पाठविला आहे. लवकरच नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचे तिडके यांनी प्रसिद्धी पत्रातून कळविले आहे. (APMC Election Result Live Updates)
नानाजी तुपट यांनी 2 वर्षांपुर्वी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काॅंग्रेस पक्षाने नानाजी तुपट यांना पक्षात प्रवेश दिला. व सोबतच सक्रिय कार्य करण्यासाठी किसान सेलचे तालुकाध्यक्षपद दिले. तुपट यांनी पक्षात सक्रिय भुमिका बजावली नाही. पक्षात प्रवेश केल्यापासून नवीन कार्यकर्ते पक्षाला जोडले नाहीत. रहिवासी असलेल्या स्थानिक खरकाडा ग्रामपंचायतीत काॅंग्रेस पक्षाचा केवळ 1 सदस्य निवडुन आला. त्यानंतर तेथील ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष रविंद्र ढोरे यांनी अनेकदा तुपट यांच्याबाबत तोंडी तक्रारी केल्या होत्या. आणि आता पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तुपट यांनी पक्षाविरोधात काम करीत भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करीत होते. त्यामुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी आपण पक्षात राहून अशी विरोधी भुमिका घेऊ नये अशा वारंवार सुचना केल्या. मात्र तुपट यांनी त्या सुचनांकडे कानाडोळा करीत तडकाफडकी पदाचा तालुका अध्यक्ष यांच्यावर मनमानीपणाचा खापर फोडत राजीनामा दिला. तुपट यांचा राजीनामा मंजूर केला असून लवकरच नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल असे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.