Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे १५, २०२३

पोहण्यासाठी गेलेल्या 9 मुली बुडाल्या

Khadakwasala Dam Pune : पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 9 मुली बुडाल्या. बुडालेल्या 9 जणींपैकी 2 जणींचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी 5 मुलींना वाचवले. अद्याप 2 जणी बेपत्ता आहेत. अग्नीशमन दलाच्या पथकाच्या मदतीने बेपत्ता मुलींचा शोध सुरू आहे. गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत ही घटना घडली. वाचवलेल्या 5 मुलींना जवळच्या खानापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून सोमवारी दोन मुलींचा मृत्यू झाला. इतर पाच मुलींचा प्राण वाचविण्यात स्थानिकांच्या सतर्कतेमुळे यश आले. याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाच्या मागील बाजूच्या 20 किलोमीटर पाणलोट परिघात पर्यटकांना जाण्यास निर्बंध घालण्याचा विचार जलसंपदा विभाग करीत आहे. लवकरच त्याबाबतचे आदेश काढण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

चार तरुणांचा आंघोळ करताना बुडून मृत्यू

गडचिरोली (GADCHIROLI) जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेज असून, चार तरुणांचा आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. 

चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज (Chichdoh Barrage) मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

मोनू त्रिलोक शर्मा (२६), रा. गडचिरोली, प्रफुल्ल विठ्ठल येलुरे ( २० ), शुभम रुपचंद लांजेवार (२४), महेश मधुकर धोंगडे (२०) सर्व रा. चामोर्शी अशी मृतांची नावे आहेत. आज उपरोक्त चार जणांसह अन्य काही युवक चिचडोह बॅरेजवर गेले होते. पाच जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाले. एक जण कसाबसा बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, तुषार पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परंतु नाव उपलब्ध नसल्याने पोलिसांनी पाण्यात उड्या मारल्या. तासभर शोधमोहीम राबविल्यानंतर पोलिसांनी काही युवकांच्या साह्याने दोरखंडाचा आधार घेत चार युवकांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. 
 


पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार


नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन


यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2023 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.Monsoon


 वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतची सर्व गावे व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरुनी नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदी घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे, बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे,असे आवाहन लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले आहे. Monsoon

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जुन 2018 मध्येच पूर्ण झाले असून सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरचे बाजूस 4 किलोमीटर वर आहे. बॅरेजची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांब × 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहे. दि. 15ऑक्टोबर 2022 पासून संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले होते.

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदीकाठावरील गावे:

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदी काठावरील गावांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, चामोर्शी तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायत अंतर्गत कुरुड व रामपूर, विसापूर ग्रामपंचायतीअंतर्गत विसापूर, निमगाव, खोर्दा व हिवरगांव तसेच तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव (रै), आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, दोटकुली तर गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव(बु.), शिवणी, मुडझा(बु.) व पुलखल आदी गावे तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याअंतर्गत हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेंगाव, कापसी व उपरी आदी गावांचा समावेश आहे.
000000

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.