Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २९, २०२३

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील १९४६ लोककलावंतांचा सहभाग | Ramnavami Mandir Ayodhya

बल्लारपूरकरांनी अनुभवली लोककलावंतांची मांदियाळी!
सुधीर मुनगंटीवार यांच्या धडपडीबद्दल कलावंतांनी व्यक्त केली कृतज्ञता !


चंद्रपूर - श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला राममय झालेल्या चंद्रपुरात खऱ्या अर्थाने लोककलावंतांची मांदियाळी अनुभवाला आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या जवळपास दोन हजार लोककलावंतांच्या सहभागाने श्रीरामचंद्रांना पारंपरिक कलांमधून अभिवादन करण्यात आले. राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लोककलांना राजाश्रय मिळत असल्याची भावना व्यक्त केली. 


चंद्रपुरातील सागवान काष्ठ अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी पाठविण्याचा भव्यदिव्य सोहळा आज बल्लारपूर येथे  आयोजित करण्यात आला. काष्ठपुजन आणि शोभायात्रेच्या निमित्ताने आसपासच्या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्र व शेजारच्या राज्यांमधून लोककलावंत चंद्रपुरात सहभागी झाले. चंद्रपूर व बल्लारपूरमध्ये जागोजागी पारंपरिक वातावरण होते. आणि या वातावरणात रंग भरण्याचे काम केले ते लोककलावंतांनी. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील लोककलावंत तर उत्साहाने सहभागी झालेच. शिवाय दक्षिणेतील लोककलावंतही भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. अगदी ढोलताशा पथक आणि भजन मंडळींसह आदिवासी तूर नृत्य, तारपा नृत्य, धनगरी तोफ, दशावतार, कोकणातील पालखी, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, दक्षिणेतील बाहुल्या, चंद्रपुरातील गुसाडी पारंपरिक नृत्य, सोंगी मुखवटे यासह झाडीपट्टीतील लोककलांचे सादरीकरण यावेळी झाले. याशिवाय दाणपट्टा, तलवार, मल्लखांब या पारंपरिक युद्धकला व खेळांचेही सादरीकरण खेळाडूंतर्फे झाले. 


दिग्गज लोककलावंत
बल्लारपूर आणि चंद्रपूर येथील  या उत्सवासाठी राज्यभरातील दर्जेदार कलावंत दाखल झाले होते. विविध लोककलांमध्ये राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करणारे कलावंत आणि लोककला समूह चंद्रपुर जिल्ह्यात  दाखल झाल्याने एक अनोखी मेजवानी भाविकांना मिळाली.  

लोककलांना राजाश्रय
काही दिवसांपूर्वी तमाशा कलावंतांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी लोककलावंतांना मोठा दिलासा दिला होता. या निर्णयानंतर तमाशा कलावंतांनी साश्रू नयनांनी आभार मानले होते. चंद्रपुरातील लोककलावंतांचा भव्य मेळा बघताना त्याची पुन्हा एकदा सर्वांना आठवण झाली. लोककलांना व्यासपीठ आणि राजाश्रय या दोन्ही गोष्टी देण्याच्या ना. मुनगंटीवार यांच्या धडपडीबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.