Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २२, २०२३

गडचिरोलीच्या बोधीला उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर | scholarship higher education

जगातील १५ स्काॅलर्समध्ये निवड : वंचित, आदिवासींच्या कामाची परदेशात दखल

गडचिरोली / चंद्रपूर
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त देण्यात येणारी 'इरासमूस मुंडस' ही ४५ लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. जगभरातून या शिष्यवृत्तीसाठी केवळ १५ स्कॉलर्सची निवड करण्यात आली. इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन देशात पुढील दोन वर्षे जगातील विविध चार नामांकित विद्यापीठाच्या संयुक्त अभ्यासक्रमात बोधी कायद्याचे उच्चशिक्षण घेणार आहे. अवघ्या २४ वर्षाच्या या तरुणाने वंचित, आदिवासींच्या हक्कांसाठी कायद्याच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामाची दखल युरोपियन देशांनी घेवून शिष्यवृत्ती बहाल केली. scholarship higher education आदिवासीबहुल भागातून जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती कर्तृत्वाने मिळवणा-या बोधी रामटेके या तरुण वकीलाने चामोर्शी व गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावली आहे.

बोधीचे प्राथमिक शिक्षण चामोर्शी व नवोदय विद्यालयात झाले. पुण्यातील आय.एल.एस.विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण घेतांनाच 'पाथ' या सामाजिक संस्थेची स्थापना समविचारी मित्र ॲड.दीपक चटप व ॲड.वैष्णव इंगोले यांच्यासोबत करुन राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे काम केले. त्याच्या सामाजिक कामाची विधायक दखल युरोपीय देशांनी घेतली आहे. 'ह्यूमन राईट्स प्रॅक्टिस अँड पॉलिसी' या अभ्यासक्रमासाठी स्विडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ गॉथेनबर्ग, स्पेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ देऊस्टो, लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ रोहम्पटन, व नार्वे येथील युनिव्हर्सिटी ऑफ ट्रॉमसो या चार देशातील जागतिक विद्यापीठात पुढील दोन वर्षे तो उच्चशिक्षण घेणार आहे. यासाठीच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी युरोपीयन कमीशनने घेतली आहे.  scholarship higher education



• गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन प्रश्नांना वाचा फोडली.
• कोरो इंडिया या संस्थेद्वारा समता फेलोशीप मिळवून संविधानिक मुल्यांवर काम व 'संविधानिक नैतिकता' हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.
• गडचिरोलीतील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील गरोदर महिलांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, यासाठीच्या याचिका महत्वपूर्ण ठरल्या.
• आदिम समुदायांना न्यायव्यवस्थेत येणा-या अडचणींवर संशोधन करुन इजिप्त देशात आतंरराष्ट्रीय परिषदेत अहवाल सादर केला.
• दुर्गम गावात आवश्यक रस्ते व पुल यांबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांना पत्र लिहिले. जनहित याचिकेच्या माध्यमातून गडचिरोलीतील दुर्गम वेंगणुर भागातील १५०० नागरिकांना रस्ता व पुल मिळावा यासाठी न्यायिक लढा दिला.
• कायद्याची सोप्या भाषेत माहिती देणारे 'न्याय' हे पुस्तक लोकप्रिय व वंचित घटकांसाठी महत्वपूर्ण ठरले. 
• दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विधी संशोधक म्हणून करत असलेले काम उल्लेखनीय ठरले. 

••••


तळागाळातील घटकांसाठीच शिक्षणाचा उपयोग
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व आई-वडील-मित्रांचे प्रोत्साहन माझ्या वाटचालीत महत्त्वपुर्ण आहे. समाजातील वंचित, आदिवासी समुदायाचे प्रश्न प्रत्यक्ष जमीनीपातळीवर काम करतांना अनुभवले. उच्चशिक्षण घेवून जागतिक स्तरावर येथील प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, हे प्रत्येक सुशिक्षितांचे स्वप्न असायला हवे. युरोपीयन देशांनी विश्वास दाखवून दिलेली ही संधी पुढील काळात वंचित घटकांसाठी रचनात्मक काम उभे करण्यासाठी बळ देणारे आहे. 
- ॲड.बोधी रामटेके 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.