श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानच्या सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी वाढीव निधी मिळणार
- पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
- १५१ लक्ष ७३ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता
गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज (kondayya maharaj) संस्थान धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी आता वाढीव निधी मंजूर करण्यात आला असून मूळ ९७. ८३ लक्ष रुपयांचा प्रस्ताव आता सुधारित प्रशासकीय मान्यतेसह १५१.७३ लक्ष रुपये झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. धाबा सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी सदर वाढीव ५३.९० लक्ष रुपये जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आले आहे.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी शासन आदेश निर्गमित करत ९७ लक्ष ८३ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. स्थापत्य कामाच्या परिमाणात बदल झाल्यामुळे, आता धाबा सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी मुळ प्रशासकीय मान्यतेऐवजी रुपये १५१.७३ लक्ष रुपये सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज संस्था अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असून, या ठिकाणी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे लाखो भावीक दर्शनासाठी दरवर्षी यात्रेनिमित्त येत असतात, माघ शुद्ध तृतीया या ठिकाणी मोठी यात्रा भरते या ठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी सांस्कृतिक सभागृहाची मागणी करण्यात आली होती. आता ५३.९० लक्ष रुपये हा वाढीव निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
chandrapur News