आ. वडेट्टीवारांची जि. प. कोसंबी (खड) शाळेला अकस्मात भेट
विद्यार्थ्यांची विचारपूस -: शिक्षकांना कानपिचक्या
ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गैरहजेरीवरून संताप व्यक्त करून बंड पुकारत मोर्चा काढला. याची गंभीर दखल घेत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी आज जि. प. प्राथमिक शाळा कोसंबी (खड) येथे अकस्मात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत शिक्षकांना चांगलेच धारेवर धरत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता दर्जा तपासात कानपिचक्या दिल्या.
ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथे १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण देणारी जि. प. शाळा असुन येथे ५ शिक्षक कार्यरत आहे.मात्र येथील कार्यरत शिक्षक हे मुख्यालयी राहात नसून ब्रम्हपुरी वरून ये - जा करतात. यामुळे शिक्षक वृंद वेळेवर शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असून अनेक विषयाच्या तासिका होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सदोष कार्यप्रणालीवर ठपका ठेवत गावातून प्रभात फेरी काढत आगळे -वेगळे आंदोलनं केले. सदर आंदोलनाची गंभीर दखल राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी घेत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसंबी (खड) येथे ब्रम्हपुरी गटविकास अधिकारी पुरी यांना सोबत घेऊन अकस्मात भेट दिली. यानंतर आ. वडेट्टीवार यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विचारपूस करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत गुणवत्ता दर्जा ही तपासला. तर विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडत शिक्षकांच्या लेट लतीफ कारभाराचा आढावा आमदार महोदयांसमोर निडरपणे मांडला. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त होताच माजी मंत्री वडेट्टीवार यांनी ग्राम सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्या समक्ष शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. तर मुख्यालयी न राहता कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता अदा न करण्याचे आदेश देत पुढील महिनाभरात शैक्षणिक गुणवत्ता दर्ज्यात वाढ व विद्यार्थ्यांची प्रगती बाबत गांभीर्याने न घेतल्यास शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करून कठोर कारवाई करणार असल्याची तंबी देखिल दिली.
आज क्षेत्र आमदार वडेट्टीवार यांच्या भेटीने शिक्षकांची तारांबळ उडाली. तर थेट विद्यार्थ्यांप्रती आ. वडेट्टीवार यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबाबत गावकरी आणि विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.